no images were found
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करा; कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
कोल्हापूर :निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा व मत चोरीचा गंभीर आरोप करत काँग्रेस पक्षाने आज कोल्हापुरात जोरदार आक्रमक पवित्रा घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने सेवामुक्त करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात आणि शिष्टमंडळात महाविकास आघाडी व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◼️काय आहेत मुख्य आरोप?
निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर सत्ताधारी पक्षाला फायद्यासाठी ‘मॅच फिक्सिंग’ सुरू असल्याचा संशय आता खरा ठरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
* सहकाऱ्यांना अंधारात ठेवले: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्त – श्री. सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांना अंधारात ठेवून एकतर्फी व हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतले. गेल्या १० महिन्यांत सहकाऱ्यांनी तब्बल १४ वेळा त्यांच्या निर्णयांवर आक्षेप नोंदवले आहेत.
* मोठ्या प्रमाणावर नावे वगळली: पश्चिम बंगालमध्ये ९२ लाख, बिहारमध्ये लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली, तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी ४७ लाख बोगस मतदार वाढवून मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
* संविधान व लोकशाहीची हत्या: निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीचे केंद्रीकरण करून सत्ताधारी भाजपला अनुचित लाभ मिळवून दिला जात असल्याचा आरोप करत, ही कृती देशद्रोहाची व लोकशाहीची हत्या करणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या आंदोलनात आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राजुबाबा आवळे, शहराध्यक्ष प्रविण केसरकर, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, जि. प. चे विरोधी पक्षनेते एकनाथ पाटील, नगरसेवक राहुल माने, दुर्वास कदम, नगरसेविका स्वाती यवलुजे, दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, तौफिक मुल्लाणी, बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, वैशाली महाडीक, विनायक घोरपडे, सागर कोंडेकर, प्रवक्ते ॲड. अमोल माने यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांवर कठोर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.