no images were found
पुणे:-देशाच्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असल्यास ते मांडण्यासाठी संविधानाने संसदीय, न्यायिक आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. अशा परिस्थितीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)ने २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची हाक देणे आणि या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी समर्थन देणे, यामुळे या आंदोलनाच्या उद्देशाबरोबरच त्याच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. हे आंदोलन म्हणजे देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले.
राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोज जनता पार्टी आहे का? त्यांनी आपल नाव बदलून राजीनामा जनता पार्टी कराव अश्या शब्दात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले साहेबांनी सीजेपी च्या भूमिकेवर टीका केली आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये, असे आवाहन देखील आठवले साहेबांनी केले असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
“निवडणूक आयोगाबाबत आक्षेप असतील तर ते पुराव्यांसह संसदेत, न्यायालयात आणि संबंधित घटनात्मक संस्थांसमोर मांडता येतात. मग देशव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय तणाव निर्माण करण्याची गरज काय?”, देशाच्या संविधानावर सीजेपी ला विश्वास आहे की नाही? असे सवाल देखील डॉ.चलवादी यांनी उपस्थित केले.
केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. अश्यात गंभीर आरोप असतील तर “महाभियोगासदृश घटनात्मक प्रक्रिया” उपलब्ध असताना रस्त्यावर संघर्ष उभा करण्याचा आग्रह कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला.सीजेपी ने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करणे हा त्यांचा लोकशाही अधिकार असला, तरी आरोपांची सत्यता सिद्ध करण्यासाठी तथ्य आणि पुरावे समोर ठेवण्याऐवजी आंदोलनाच्या माध्यमातून संस्थांबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे योग्य नाही, अशी टीका डॉ.चलवादी यांनी केली.
लोकशाहीमध्ये सरकारवर किंवा घटनात्मक संस्थांवर टीका करण्याचा अधिकार आहे; मात्र त्याचबरोबर संस्थात्मक प्रक्रियेचा आदर करणेही आवश्यक आहे. “लोकशाही मजबूत करण्याच्या नावाखाली देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण अस्थिर होणार नाही, याची जबाबदारी आंदोलनकर्त्यांनीही स्वीकारली पाहिजे,” असे डॉ.चलवादी यांनी म्हटले.