no images were found
कचऱ्यात सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार : गणेश आरतीचा मान देत महापालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळाकडून गौरव
कोल्हापूर, : ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता पहाटेपासून शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. गौरी आगमनाच्या दिवशी सी वॉर्डातील सफाई कर्मचारी सुधीर इंगवले, महादेव कांबळे, अमृत कांबळे आणि अभिषेक गायकवाड यांना कचऱ्यामध्ये सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण सापडले.
गंठण सापडल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्याच्या मालकाचा शोध घेतला असता मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी परिसरातील हॉटेल सारथी येथे काम करणाऱ्या धनश्री वरुटे यांचे दीड तोळ्याचे गंठण हरविल्याचे समोर आले. त्यानंतर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी चौकशी करून सदर सोन्याचे गंठण संबंधित महिलेकडे प्रामाणिकपणे सुपूर्द केले.
महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत हॉटेल सारथीच्या मालकांनी त्यांचे कौतुक करून त्यांना रोख बक्षीस देत सन्मान केला.
या प्रामाणिक कार्याची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्यावतीने विठ्ठल रामजी शिंदे चौकात बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तीची आरती करण्याचा मान या चारही सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आला. तसेच माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्या हस्ते सुधीर इंगवले, महादेव कांबळे, अमृत कांबळे आणि अभिषेक गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
स्वच्छतेचे काम करताना मिळालेली मौल्यवान वस्तू स्वतःकडे न ठेवता ती संबंधित व्यक्तीला परत करून या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण दिले आहे. त्यांच्या या कृतीचे उपस्थित पदाधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांनी कौतुक केले.
यावेळी कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, महापालिका कर्मचारी तसेच सफाई कामगार संख्येने उपस्थित होते.