Oplus_131072
no images were found
इराणी खण येथील गणेश विसर्जनस्थळाची महापौर सौ रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड त्यांच्याकडून पाहणी
विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज; ३०० आयशर, ६५० हमालांसह अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनात
कोल्हापूर, : घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. इराणी खण येथे करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेची महापौर सौ. रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज दुपारी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. यावेळी या ठिकाणी बसवण्यात आलेल्या स्वयंचलित यंत्राची चाचणी महापौरांच्या हस्ते गणपतीची मूर्ती ठेवून घेण्यात आली.
या प्रसंगी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता मिलिंद पाटील, आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, विद्युत अभियंता अमित दळवी आदी उपस्थित होते.
महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी शहरवासीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून इराणी खण येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने स्वयंचलित विसर्जन यंत्रणा उभारण्यात येत आहे. यावर्षी शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी ही स्वयंचलित यंत्रणा काल रात्री बसविण्यात आली आहे. शहरातील चारही विभागीय कार्यालयांतर्गत विसर्जन कुंडांमधून संकलित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती या यंत्रणेद्वारे इराणी खण येथे विसर्जित करण्यात येणार आहेत.
विसर्जन व्यवस्थेसाठी महापालिकेच्या वतीने ३०० आयशर वाहने व ६५० हमालांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात १६० विसर्जन कुंड ठेवण्यात आले असून, महापालिकेचे अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत.
विसर्जनस्थळी आवश्यक यंत्रसामग्रीही सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये ७ जेसीबी, ७ डंपर, ८ ट्रॅक्टर, ४ पाण्याचे टँकर, २ बूम, ५ रुग्णवाहिका, ५ साधे तराफे, १० फ्लोटिंग तराफे व २ क्रेन यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात करण्यात येणार आहेत. तसेच विद्युत विभागाच्या वतीने विसर्जनस्थळी पुरेशा प्रमाणात मोठ्या लाईटची व्यवस्था करण्यात येत असून, सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येत आहेत.
*निर्माल्य संकलन व सेंद्रीय खत निर्मितीवर भर*
विसर्जनस्थळी तसेच शहरातील विविध विसर्जन कुंडांजवळ निर्माल्य संकलनासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. २३ आरोग्य निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी चार कर्मचारी दोन शिफ्टमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच शहरातील १४ प्रमुख विसर्जनस्थळी प्रत्येकी १५ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तैनात करण्यात येणार आहेत.
संकलित निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी व आयसोलेशन हॉस्पिटल येथे स्वतंत्र खड्डे तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी निर्माल्याचे विलगीकरण करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी अवनी, एकटी, वसुंधरा तसेच इतर सेवाभावी संस्थांच्या सुमारे १५० महिला सदस्यांचा सहभाग राहणार आहे.
शहरातील नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सौ.रूपाराणी निकम यांनी केले.