no images were found
गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजन
कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर (गोकुळ) या सहकारी संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या निवडणुकीसाठी कोल्हापूर येथील बहुउद्देशीय हॉल रमणमळा येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय उभारण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी एकूण ९ टेबल लावण्यात आली असून यात ५ टेबल ही सर्वसाधारण मतदारसंघासाठी तर ४ टेबल ही राखीव प्रवर्ग साठी असतील. नामनिर्देशन पत्र दाखल करणे कामी ३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून करण्यात आली आहे. संघाच्या निवडणूकीचे स्वरूप पाहता संघाच्या निवडणूक प्रक्रिये दरम्यान अनावश्यक गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी उमेदवार/सुचक व एक व्यक्ती यानांच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय हे रहिवासी क्षेत्रात येत असल्याने, मा. सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थानिक रहिवाशी यांचे दैनंदिन कामकाजात अडथळा व व्यत्यय होणार याची काळजी घेण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार आणि तसेच सध्या राज्यभर गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेवरील अतिरीक्त ताण पाहता उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी वाहतूक विभागाकडील नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या वाहनांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वाहतूक शाखा कोल्हापूर यांचेकडून नियोजन पुढीलप्रमाणे केले आहे.
स्थानिक रहिवाशी, निवडणूक निर्णय अधिकारी स्टाफ व उमेदवार यांची वाहने वगळून रमण मळ्यातून येऊन ड्रीम वर्ल्डचे पाठीमागील रोडने धोबीघाट पर्यंत ये-जा करणे तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडाऊनकडे जाण्यास तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडाऊनकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी व स्टाफ यांच्या वाहनाकरिता तसेच इतर शासकीय वाहनाकरिता बहुउद्देशीय हॉलचे उजवे बाजूस तर लोकप्रतिनिधी यांच्या वाहनाकरिता बहुउद्देशिय हॉलचे डाव्या बाजूस तर उमेदवार यांच्या वाहनासाठी धोबीघाट समोरील जागा ही पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उमेदवार यांच्या वाहनासोबत आलेल्या इतर सर्व वाहनाकरिता पोस्ट ऑफिस ते पितळी गणपती मार्गावरील रोडचे कडेला पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी निवडणूक कार्यालयाच्या आवारामध्ये वाहनांची अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.