Home सामाजिक संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

0 second read
0
0
5

no images were found

संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

कोल्हापूर,: संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या विचारांची आजच्या समाजाला मोठी गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र आणि मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विचारशलाका’ त्रैमासिकाच्या ‘संत तुकाराम व संत कबीर विचारविश्व विशेषांका’च्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते. यावेळी ‘विचारशलाका’चे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कुलगुरूंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कुलगुरू डॉ. कामत यांनी संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्याचे तसेच त्यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाचे महत्त्व स्पष्ट करताना ‘विचारशलाका’च्या माध्यमातून वैचारिक साहित्याची निर्मिती व प्रसार करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. संत तुकाराम आणि कबीर यांनी समाजातील रूढी, विषमता आणि कर्मकांडावर प्रखर प्रहार करत समता, बंधुता आणि मानवतावादी मूल्यांची मांडणी केली. त्यांच्या साहित्याचा आणि सामाजिक विचारांचा आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेतही मोठा संदर्भ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी संत तुकाराम आणि कबीर यांच्या साहित्याचा समाजजीवनावर पडलेला प्रभाव विषद केला. या दोन्ही संतांची वैचारिक व सैद्धांतिक मांडणी स्पष्ट करताना त्यांनी त्यांच्या विचारांमधील सामाजिक समतेचा आग्रह अधोरेखित केला. तसेच सूफी परंपरा आणि वारकरी परंपरेच्या संदर्भात कबीर आणि तुकाराम यांचे महत्त्वही स्पष्ट केले.

डॉ. नंदकुमार मोरे यांनी संत तुकाराम आणि कबीर यांनी लोकभाषेच्या माध्यमातून व्यापक समाजाशी साधलेला संवाद हा त्यांच्या साहित्याच्या प्रभावाचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.

प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी ‘विचारशलाका’च्या प्रवासाची माहिती दिली. तसेच, समाजात चिकित्सक आणि विवेकशील विचारांची निर्मिती करण्यासाठी वैचारिक साहित्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमास राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले

कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले  गणेश च…