Home Uncategorized डिजिटल पत्रकारांनी कायद्यांची जाण ठेवावी : डॉ. शिवाजी जाधव

डिजिटल पत्रकारांनी कायद्यांची जाण ठेवावी : डॉ. शिवाजी जाधव

0 second read
0
0
23

no images were found

डिजिटल पत्रकारांनी कायद्यांची जाण ठेवावी : डॉ. शिवाजी जाधव : सांगलीत राज्यस्तरीय कार्यशाळा; डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचा उपक्रम

कोल्हापूर : डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता पत्रकारांनी बातमी देण्याच्या वेगासोबतच कायदेशीर बाबींचे भान ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मजकुराची कायदेशीर जबाबदारी समजून घेऊन पत्रकारांनी काम करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे पत्रकारांसाठी एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस राज्यभरातून ३०० हून अधिक पत्रकारांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेतील पहिल्या सत्रात डॉ. शिवाजी जाधव यांनी ‘डिजिटल माध्यमांसाठी कायदेशीर तरतुदी’ या विषयावर मार्गदर्शन केले. डिजिटल माध्यमांवर बातमी, छायाचित्र, व्हिडिओ किंवा अन्य माहिती प्रसिद्ध करताना पत्रकारांनी कोणत्या कायदेशीर बाबींची काळजी घ्यावी, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, तसेच पत्रकारितेतील निष्काळजीपणामुळे कायदेशीर अडचणी कशा निर्माण होऊ शकतात, याचे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विवेचन केले.
‘बातमी सर्वप्रथम देण्याच्या स्पर्धेपेक्षा बातमी अचूक आणि कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित असणे अधिक महत्त्वाचे आहे,’ असे सांगत त्यांनी डिजिटल पत्रकारांनी माहितीची पडताळणी करूनच ती प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर एखादी माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे म्हणून ती खरी असेलच असे नाही. त्यामुळे स्रोताची विश्वासार्हता तपासणे आणि आवश्यक त्या कायदेशीर बाबींचा विचार करणे ही पत्रकारांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार विवेक वाघमोडे यांनी ‘फेक न्यूज कशी ओळखावी?’ या विषयावर मार्गदर्शन केले. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती वेगाने प्रसारित होत असून त्याचा परिणाम समाजाच्या विचारप्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी व्हायरल संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ आणि दावे यांची तथ्य पडताळणी करूनच त्यांचा बातमीसाठी वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
फेक न्यूज ओळखण्यासाठी माहितीचा मूळ स्रोत शोधणे, उपलब्ध संदर्भ तपासणे, छायाचित्र किंवा व्हिडिओची सत्यता पडताळणे आणि संबंधित व्यक्ती अथवा संस्थेकडून माहितीची पुष्टी करणे आवश्यक असल्याचे वाघमोडे यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेस मराठी पत्रकार परिषदेचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील यांच्यासह राज्यातील विविध भागांतून आलेले ३०० हुन अधिक पत्रकार उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…