Home Uncategorized दर्जा घसरल्यास कामे बंद; उत्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना 5 स्टार मानांकन — आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

दर्जा घसरल्यास कामे बंद; उत्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना 5 स्टार मानांकन — आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

1 min read
0
0
7

no images were found

दर्जा घसरल्यास कामे बंदउत्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना 5 स्टार मानांकन — आयुक्त डॉराजेंद्र भारुड

कोल्हापूर, : शहरातील रस्त्यांच्या कामांचा दर्जा सुधारण्यासाठी दोष दायित्व कालावधीतील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. 10 सप्टेंबरपर्यंत दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची दुरुस्ती न करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच अशा ठेकेदारांना यापुढे महापालिकेचे कोणतेही काम दिले जाणार नाही असा स्पष्ट इशारा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला.

            शहरातील रस्त्यांच्या दर्जाबाबत संबंधित ठेकेदारांची आयुक्त कार्यालयात आज सायंकाळी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. भारुड यांनी ठेकेदारांना सक्त सूचना दिल्या. रस्त्यांच्या कामांमध्ये डांबराची गुणवत्ता, रस्त्याच्या थराची जाडी व थिकनेस याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महापालिकेकडून रस्त्यांच्या कामांचे रॅन्डम ऑडिट करण्यात येणार असून, काम करताना अपेक्षित दर्जापेक्षा चांगला दर्जा ठेवावा; मात्र कमी दर्जाचे काम अजिबात खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले. यापुढे रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेनुसार ठेकेदारांना 5 स्टार मानांकन देण्यात येणार आहे. चांगले काम करणाऱ्या ठेकेदारांना उच्च मानांकन देण्यात येईल तर कामाचा दर्जा घसरल्यास त्यानुसार मानांकन कमी केले जाईल. उच्च मानांकन असलेल्या ठेकेदारांनाच प्राधान्याने पुढील कामे देण्यात येतील असेही आयुक्तांनी सांगितले. ऑक्टोबरपासून मंजूर रस्त्यांची कामे प्रत्यक्ष सुरू झाली पाहिजेत. मंजूर कामे सुरू न झाल्यामुळे नागरिकांच्या रोषाला महापालिकेला सामोरे जावे लागत आहे. डांबराचे दर वाढले, वर्कऑर्डर स्वीकारत नाही किंवा अॅग्रीमेंट केले नाही अशी कारणे यापुढे चालणार नाहीत. ज्या दराने निविदा भरली आहे त्याच दराने काम करावे लागेल असे आयुक्तांनी ठेकेदारांना स्पष्ट सांगितले. नवीन रस्त्यांचे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित रस्त्याखालील पाणीपुरवठा यंत्रणेची माहिती घेणे आवश्यक आहे. यापुढे रस्त्यांच्या कामांची यादी माझ्याकडे सादर करण्यात यावी. त्यावर पाणीपुरवठा विभागाचा अभिप्राय घेतल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या.

            अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी गणेशोत्सव सह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दोष दायित्व कालावधी तील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. गणेशोत्सवापूर्वी आठ दिवसांत युद्धपातळीवर रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. कोणतेही कारण चालणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

            शहर अभियंता रमेश मस्कर यांनी सन 2024-25 मधील 9, सन 2025-26 मधील 52 आणि सन 2026-27 मधील 64 रस्त्यांची कामे मंजूर असल्याची माहिती दिली. यापैकी दोष दायित्व कालावधीतील काही रस्त्यांवर खड्डे वाढले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच 100 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पातील 16 मंजूर रस्त्यांची उपशहर अभियंत्यांनी पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. 25 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे सांगितले.

            यावेळी उप-आयुक्त परितोष कंकाळ, उप-शहर अभियंता अरुणकुमार गवळी, सुरेश पाटील, निवास पोवार, मिलिंद जाधव, प्रणव कंन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी विजयसिंह सावंत, मे.संगीता कंन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी अभिजीत कांबळे, ठेकेदार बबन पोवार, राहुल पाटील, प्रथमेश खाडे, अनिल पाटील, उत्तम पाटील, राजेश व्हटकर व रमेश धुमाळ आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत तपास प्रक्रियेला गती द्या   -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत तपास प्रक्रियेला गती द्या   -जिल्हाधिकारी डॉ. विजय रा…