no images were found
छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीच्या बाल्कनीचा गिलावा पडला ; सुरक्षिततेसाठी सेफ्टी नेट लावणार
कोल्हापूर, : महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केट येथील इमारतीच्या बाल्कनीचा गिलाव्याचा अंशतः भाग आज (दि. 27) दुपारी 12 वाजता चप्पल लाईन दुकानासमोरील बाजूस पडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीचे बांधकाम सन 1989 मध्ये पूर्ण झाले असून इमारतीस 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. इमारतीच्या काही भागाचे यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत महापालिका पॅनेलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअर यांना यापूर्वीच कळविण्यात आले असून, त्यानुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सध्या सुरू आहे.
दरम्यान, आज बाल्कनीचा गिलावा पडल्याची घटना घडल्यानंतर संबंधित इमारतीची पाहणी करण्यात आली. इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरती उपाययोजना म्हणून रस्त्याकडील बाजूस सेफ्टी नेट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्यानंतर स्ट्रक्चरल अभियंत्यांनी सुचवलेल्या उपाययोजना नुसार इमारतीच्या दुरुस्ती बाबत आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.