no images were found
एनआयटी विद्यार्थ्यांची आंबा जंगल पदभ्रमंती…अनुभवले वन्यजीव रक्षणाचे महत्त्व
कोल्हापूर( प्रतिनिधी ,):-‘सहजीवनाद्वारे वन्यजीव संरक्षण’ या संकल्पनेवर आधारित यावर्षीच्या वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्यजीव व मानव सहजीवनाची जाणीव व महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने एनआयटी कोल्हापूर विद्यार्थ्यांची आंबा, पेंडाखळे व पावनखिंड येथे पदभ्रमंती पार पडली. यामध्ये कम्प्युटर आणि एआयएमएल विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मोहिमेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. अमोल कुलकर्णी यांनी आंबेश्वर देवराई व आदिष्ठी देवराई येथे ‘देवराई संवर्धनाचे महत्त्व व पक्षांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन’ यावर मार्गदर्शन केले. वनरक्षक रोहिदास पडवळ यांनी जंगल सड्यावर जैवविविधतेवर मार्गदर्शन केले. मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांनी ‘प्राण्यांच्या रस्ते अपघातावर उपाययोजना’ यावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना गवा, राज्यप्राणी शेकरू व धनेश पक्षाचे दर्शन झाले आणि गवा, सांबर व रानडुक्कर यांचे ठसे पाहिले. वन्यजीव चित्रफित, वाघझरा, विविध फुलपाखरे, कारवीची व ऑर्किड फुले, सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी, मिलिपेड, खापरखवल्या साप, हरणटोळ, स्मिथिया, वेन, सोनकी, गेंद फुले या दुर्मिळ गोष्टी मुलांनी पाहिल्या.
आंबाचे माजी सरपंच कृष्णात दळवी यांचे सहकार्य लाभले. मोहिमेसाठी संचालक डाॅ. संजय दाभोळे, विभागप्रमुख प्रा. दिपक जगताप व प्रा. विक्रम गवळी यांचे प्रोत्साहन लाभले. समन्वयक प्रा. रश्मी पंडे व प्रा. शामली चव्हाण यांनी नियोजन केले. प्रा. सुधीर देसाई, प्रा. गौरी क्षीरसागर, प्रा. प्राजक्ता पाटील, निशांत माजगावकर, आशिष पाटील, सौ. वाडकर सहभागी होते.