no images were found
शिवसेना अकोला उपशहरप्रमुख याच्या खूनप्रकरणी दोघांना अटक
अकोला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोला उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्या खून प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवानंद मनोहर दोरवेकर आणि विनोद रमेश कांबळे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
विशाल रमेश कपले हे रविवारी सायंकाळी मोठी उमरी भागातून दुचाकीने शहरातील जठारपेठ चौक परिसरातील कोरडे हॉस्पिटल जवळ कामानिमित्त आले होते. दरम्यान उमरी मधील महाकाली मंदिरापासून हल्लेखोर त्यांचा पाठलाग करीत होते. कोरडे हॉस्पिटल गल्लीत कपले गाडी वळवित असताना अज्ञात मारेकऱ्यांनी हाच डाव साधत त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले.पाठलाग करून पाठीत चाकू खुपसला आणि नंतर छातीत चाकूने वार केले. पाठीवर आणि छातीवर सपासप वार झाल्याने कपले जागीच कोसळले. यानंतर काही नागरिकांनी त्यांना उचलून उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उमरी परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांची कपले यांनी एका व्यक्तीच्या मार्फत पोलिसात तक्रार दिली होती. ज्या व्यक्तीने कपलेच्या वतीने तक्रार केली होती. त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र पोलिसांना दिले होते. या हत्येप्रकरणी आता दोन हल्लेखोरांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी शिवानंद मनोहर दोरवेकर आणि विनोद रमेश कांबळे यांना पोलीसांनी कारंजा येथून ताब्यात घेतले अशी माहिती किशोर शेळके (पोलिस निरीक्षक, रामदास पेठ पोलिस ठाणे, अकोला) यांनी दिली. या घटनेची पुढील चौकशी सुरु आहे. मात्र या घटनेमुळे शहरात वारंवार अश्या घटना घडत असल्याने सामान्य नागरीक पुरते हादरले आहेत.