no images were found
अॅट्रॉसिटी अंतर्गत तपास प्रक्रियेला गती द्या -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर, : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत पोलीस तपासावरील प्रकरणांना गती द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. रेश्मा पाटील, प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, जिल्हा परिषद समाज कल्याण, जिल्हा सरकारी वकील, पोलीस विभाग, जिल्हा महिला व बालविकास, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, पोलीस तपासावरील सर्व प्रकरणांचा आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करावा. तसेच प्रलंबित असलेल्या प्रकरणांना गती देवून प्रकरणांचा निपटारा जलदगतीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या.
यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकरणांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये पोलीस तपासावरील, कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेली, अर्थसहाय्य प्रकरणांचा समावेश होता. या बैठकीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या एकूण १४ प्रकरणामध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर खुन किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबींयातील एका पात्र वारसास शासकीय/निमशासकीय नोकरी मध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी प्रलंबित व चालू असलेल्या प्रकरणांबाबत सविस्तर माहिती दिली.