Home सामाजिक सर्व भेदांपलिकडे माणूस म्हणून समता जपल्यासच लिंगसमभावाची प्रस्थापना : डॉ. तारा भवाळकर

सर्व भेदांपलिकडे माणूस म्हणून समता जपल्यासच लिंगसमभावाची प्रस्थापना : डॉ. तारा भवाळकर

2 second read
0
0
156

no images were found

सर्व भेदांपलिकडे माणूस म्हणून समता जपल्यासच लिंगसमभावाची प्रस्थापना : डॉ. तारा भवाळकर

कोल्हापूर : स्त्री, पुरूष अगर तृतीयपंथी आदी भेदांच्या पलिकडे जाऊन जेव्हा आपण माणूस म्हणून समता जपण्यास प्रारंभ करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने लिंगसमभाव प्रस्थापनेच्या दिशेने जाऊ, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक व विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी आज येथे केले.

संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जगण्यातलं संविधान’ हा कार्यक्रम विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि साहित्यिक वंदना खरे प्रमुख उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘कशासाठी? लिंगभाव समतेसाठी’ या पुस्तकाचे डॉ. भवाळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तकाच्या अनुषंगाने बोलताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, हरेक लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन माणूसपणाची संवेदना जपणे फार महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने सदर पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. नकारात्मकतेकडून सकारात्कमकतेकडे घेऊन जाणारे हे पुस्तक आहे. स्त्री म्हणून आणि माणूस म्हणून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जगताना स्त्रियांच्या अनुभवाचे संचित भल्याबुऱ्या अशा अनेकांगांनी वृद्धिंगत होत जाते. त्यामुळे दिवस साजरीकरणाच्या पलिकडे तिचे दैनंदिन जगणे सुकर आणि सुखकर होईल, या दिशेने काम करण्याची गरज त्यातून अधोरेखित होते. आज आपण साक्षर आहोत, पण सुशिक्षित तेव्हाच होऊ, जेव्हा आपण लिंगभावसमतेकडे वाटचाल करू. वाचाल तर वाचाल, असे म्हटले जाते. मात्र, वाचून आपण जेव्हा विचार कराल, त्या विचाराचा जेव्हा उच्चार कराल आणि उच्चारलेले आचरणात आणाल, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुशिक्षित व्हाल, शहाणे व्हाल आणि अखेरीस यशस्वी व्हाल. लिंगसमभाव हे संविधानास अभिप्रेत असणारे मूल्य जपणे त्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

‘एक महत्त्वाचे विद्रोही पुस्तक’ अशा शब्दांत वर्णन करताना साहित्यिक वंदना खरे म्हणाल्या की, सामान्य नागरिकांचे लिंगभावसमतेविषयीचे मनोगत आणि अनुभवकथनाचे संकलन एवढेच या पुस्तकाचे महत्त्व नाही, तर संविधानाला अभिप्रेत समता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोल आणि मूल्य त्यातून जपले गेले आहे. या पुस्तकात स्त्रियांबरोबरच एक तृतीयपंथी व दोन पुरूषांची मनोगतेही आहेत. या पुस्तकाने त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली. ही केवळ स्त्रियांची रडगाणी नाहीत, तर जगताना, सोसताना त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारला आहे आणि त्याची खणखणीत उत्तरेही दिलेली आहेत, हे महत्त्वाचे. खासगी अनुभव सार्वजनिकरित्या मांडणे, ही धैर्याची बाब आहे. हे धैर्य यातील लेखकांनी दाखविले आहे आणि डॉ. दीपक पवार यांनी त्यांचे साक्षेपी संपादन केले आहे व अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही लिहीली आहे. एक महत्त्वाचे दस्तावेजीकरण महाराष्ट्र शासनाने या माध्यमातून केले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी संविधान व मतदार जागृतीच्या अनुषंगाने विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि निवडणूक कक्ष यांच्या माध्यमातून राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गेल्या तीन दिवसांत विद्यापीठातील विशेष केंद्रामध्ये १५० विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुढील काळात आदिवासी, दिव्यांग, तृतीयपंथी आदी वंचित समाजघटकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक करीत असताना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणुकीच्या पलिकडे विद्यार्थ्यांत लोकशाहीच्या जाणिवा निर्माण करण्याच्या दृष्टीने असे जागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, निवडणूक कक्ष समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह अधिविभागांतील व महाविद्यालयांतील शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आणि स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…