no images were found
डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती
तळसंदे (प्रतिनिधी): तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेत गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दिली आहे. कृषी अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेत उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने संस्थेच्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहेत.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि सीईटी सेल, मुंबई यांच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेशाची पहिली फेरी जाहीर करण्यात आली. या फेरीत एमएचटी-सीईटी परीक्षेत 96.41 पर्सेंटाईल गुण प्राप्त करणारी सानिका संजय मोरे आणि 96.19 पर्सेंटाईल गुण प्राप्त करणाऱ्या अनुष्का विकास कदम यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार म्हणाले, महाविद्यालयाने सातत्याने उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळेच राज्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाला प्राधान्य देत आहेत.
प्राचार्य शेलार यांनी यावेळी संस्थेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी दाखविलेला विश्वास कायम राखण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विविध शैक्षणिक व गुणवत्तावर्धक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अॅकॅडमिक इनचार्ज प्रा. आर. आर. पाटील, रजिस्ट्रार श्री. आर. पी. शिंदे, अॅडमिशन प्रमुख डॉ. व्ही. आर. पाटील, सर्व विभागप्रमुख तसेच प्राध्यापक उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता व कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.