no images were found
कोल्हापूर जिल्ह्यातील हरित जल क्रांती
मृदूसंधारण जलसंधारण हा शाश्वत विकासाचा पाया आहे.राज्यातील अनेक भागात खालावलेली भूजल पातळी लक्षात घेता पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर देण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी आडवा – पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देऊन राज्यात एकेकाळी जलसंधारणाची मोठी चळवळ उभारली.त्यांच्या या अतुलनीय योगदानाचे राज्यातील जनतेला कायमस्वरूपी स्मरण रहावे यासाठी राज्य शासनाने 3 जुलै 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून माजी मुख्यमंत्री श्री नाईक यांचा जन्मदिवस म्हणजेच 21 ऑगस्ट हा दिवस ” जलसंधारण दिन ” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
बदलते हवामान,बदलत्या पावसाच्या स्वरूप आणि वाढती पाण्याची गरज याचा ताळमेळ घालत जलसंधारणाला केवळ पाण्याच्या व्यवस्थापनापुरते मर्यादित न ठेवता ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधार मानले जाऊ लागले. उपलब्ध पावसाचे पाणी अडविणे ते जमिनीत मुरवणे त्याचबरोबर उपलब्ध जलसाठ्यांची क्षमता वाढविणे आणि शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र सात लाख 68 हजार 500 हेक्टर इतके असून त्यापैकी पाच लाख 22 हजार 160 हेक्टर क्षेत्र लागवडी लायक आहे .जिल्ह्याचा संपूर्ण भाग कृष्णा खोऱ्यामध्ये समाविष्ट असून यामध्ये वारणा, कृष्णा, कडवी, जांभळी, पंचगंगा, कासारी, कुंभी, धामणी, तुळशी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा, हिरण्यकेशी, घटप्रभा आणि ताम्रपर्णी या पूर्व वाहिनी व तिलारी पश्चिम वाहिनी अशा एकूण 17 नद्या आणि इतर उपनद्या वाहतात. या जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे 1800 ते 1900 मिमी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्याची सुमारे दोन लाख 71 हजार 428 हेक्टरी इतकी प्रकल्पीय सिंचन क्षमता आहे. जिल्ह्यात दोन लाख 32 हजार 362 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झालेली असून प्रत्यक्ष सिंचन क्षमता ही दोन लाख 12 हजार 750 हेक्टर इतकी आहे. मृद व जलसंधारण विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत द्वारयुक्त बंधारा, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ,पाझर तलाव , साठवण तलाव , लघु पाटबंधारे तलाव या प्रकारची 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेची कामे करण्यात आली आहेत.गत वर्षात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत द्वारयुक्त बंधारे पूर्ण करून 111.54 सगळी इतका पाणीसाठा करून अंदाजे 23.42 हेक्टर क्षेत्रास याचा लाभ झाला आहे.त्याचबरोबर महामंडळ अंतर्गत चार कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्ण करण्यात आल्यामुळे 380.50 सघमी इतका पाणीसाठा पूर्ण करून 85 हेक्टर क्षेत्रास अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ झाला आहे.जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व तीन द्वारयुक्त बंधारे पूर्ण करून 225.19 सघमी इतक्या पाणीसाठ्याद्वारे 41.13 हेक्टर इतक्या क्षेत्रास सिंचनाचा लाभ झाला आहे.गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार अंतर्गत सहा जलाशयातील अंदाजे 88.66 इतका गाळ काढण्यात येऊन 88 हजार 660 सघमी इतका पाणीसाठा पूनर्स्थापित करण्यात आला आहे. नाला खोलीकरण व रुंदीकरण अंतर्गत जिल्ह्यात 19 नाल्यांमधील गाळ काढण्यात येऊन या नाल्याची पाणी वाहून नेण्याची साठवण क्षमता पूनर्स्थापित करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये मृद व जलसंधारणाची कामे केल्यामुळे स्थानिक विहिरी कुपनलिका यांना बारमाही पाण्याचा स्तोत्र उपलब्ध झाला आहे .
कोल्हापूर जिल्हातील पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी करवीर आणि राधानगरी हे तालुके नैसर्गिक साधनसामुग्रीने संपन्न आहेत.तसेच या तालुक्यात मुसळधार पाऊस होतो परंतु या ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा भाग वाहून जात असल्याकारणाने नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते तसेच शेती विषयक त्याचबरोबर पर्यावरणासमोरही अनेक समस्या उभ्या राहत असल्याचे दिसून येते.मात्र जिल्ह्यात उभारण्यात आलेली अनेक धरणे , कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, लघु-मध्यम सिंचन प्रकल्प आणि जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात येणारी पाणी आडवा – पाणी जिरवा यासारखी योजना. त्यामुळे जल साठ्यात तसेच भूजल पातळी वाढण्याच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे.ही भूजल पातळी वाढल्यामुळे बळीराजाला चांगले दिवस आले आहेत.पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळाल्याचे दिसून येते.
पन्हाळा तालुक्यात तुळशी प्रकल्प कार्यरत असून त्याची सिंचन क्षमता सुमारे 5 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर पसरलेली आहे.त्याचबरोबर या तालुक्यात 25 हून अधिक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे – तलाव बांधल्यामुळे जवळपास अडीच हजार हेक्टर्स शेती ओलीताखाली येण्यास मदत झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून पंचगंगा नदीचा उल्लेख आपणाला करावा लागेल.करवीर तालुक्यात पंचगंगा नदीबरोबरच कुंभी,कासारी आणि भोगावती या प्रमुख नद्या कार्यरत आहेत . त्यामुळे करवीर तालुका हा सिंचनाच्या बाबतीत अत्यंत समृद्ध ठरला असून या तालुक्यात सुमारे 25 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे सिंचनाखाली येण्यासाठी मदत झाली आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना म्हणजे राधानगरी धरण होय. या स्वयंचलित धरणात साधारणता 8.36 टीएमसी इतका पाणीसाठा जमा होतो. या धरणामुळे राधानगरी व कोल्हापूरवासियांचा शेती विषयक व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली .
शाहूवाडी तालुक्यात सिंचनासाठी अनेक मध्यम व लघु प्रकल्प उभारण्यात आले आहेत .कासारी नदीवरील गेळवडे येथील कासारी धरण तसेच कुंभी आणि कडवी नदीच्या खोऱ्यातील लघु सिंचन प्रकल्पामुळे शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यातील सुमारे 6 ते 7 हजार हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण म्हणजे गगनबावडा तालुका होय.वास्तविक या तालुक्यात डोंगराळ भूप्रदेशामुळे पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या ठिकाणी बंधारे, नालेबांधणी, शेततळे त्याचबरोबर जलसाठे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित केलेल्या विविध उपाययोजनांमुळे या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन झाले आहे.या तालुक्यात धामणी प्रकल्प कार्यरत असून त्याची सिंचन क्षमता सुमारे 4 हजार 800 हेक्टरहून अधिक आहे त्याचबरोबर गगनबावडा तालुक्यात 12 हून अधिक लघु सिंचन तलाव आहेत.त्यामुळे या ठिकाणी भूजल पातळी स्थिर राहण्यास मदत होते.
जलसंधारणाची ही वाटचाल म्हणजे केवळ बंधारे, नाला खोलीकरण किंवा गाळ काढण्याची कामे नव्हेत तर पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन करून भविष्यातील जल सुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न आहे . जलसंधारण दिनाच्या निमित्ताने या कामांकडे केवळ आकडेवारीचा भाग म्हणून न पाहता भविष्यातील पाणी सुरक्षिततेचा सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहणे गरजेचे आहे. इतकच ….! (माहिती स्तोत्र :- मृद व जलसंधारण आणि पाटबंधारे विभाग): फारुख रमजान बागवान,माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर 9881400405