no images were found
विरोधकांच्या अट्टाहासामुळे सर्वसामान्यांचा भ्रमनिरास-हेमंत पाटील
पुणे, :- विरोध विशेषत: काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अट्टाहासामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळात अक्षरशः वाया गेले. विरोधकांच्या अट्टाहासामुळे सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाल्याचा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला गुरूवारी (ता.१३) केला. सत्ताधाऱ्यांकडून विविध विषयांवर चर्चा आणि निवेदने करण्याची तयारी असतानाही विरोधकांनी राजकीय हेतूने सभागृहाचे कामकाज ठप्प केले, असा आरोप देखील पाटील यांनी केला.
संसद ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांच्या घोषणाबाजी आणि गोंधळामुळे प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर आणि अन्य संसदीय कामकाजावर परिणाम झाला. २०२७ चे पावसाळी अधिवेशन २० जुलै ते १३ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात लोकसभेत केवळ १.६ तास, म्हणजे नियोजित वेळेच्या अवघ्या ५ टक्के, तर राज्यसभेत १.७ तास म्हणजे ६ टक्के कामकाज होऊ शकले, अशी आकडेवारी समोर आली आहे.
विरोधकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि जनतेचे प्रश्न मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र प्रश्न मांडण्याऐवजी सभागृहच बंद पाडणे हा लोकशाहीचा मार्ग नाही. सरकार चर्चेसाठी तयार असताना विरोधकांनी चर्चेच्या टेबलावर यायला हवे होते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
संसदीय चर्चेचे नेतृत्व करण्याऐवजी राहुल गांधी यांनी आंदोलनात्मक राजकारणाला प्राधान्य दिल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्यांच्या मते, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी संसद ठप्प करण्यापेक्षा संबंधित विषयावर नियमांनुसार चर्चा घडवून आणणे अधिक प्रभावी ठरले असते.
संसदेचा प्रत्येक मिनिट हा जनतेचा आहे. खासदारांना मिळणारा वेळ हा मतदारांनी दिलेल्या जनादेशाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे सत्ताधारी असो किंवा विरोधक-दोघांनीही संसद चालविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे पाटील म्हणाले.
संसदेत गोंधळ होणे ही केवळ राजकीय पक्षांची अंतर्गत बाब नसून त्याचा थेट परिणाम कायदे निर्मिती, सरकारची उत्तरदायित्वाची प्रक्रिया आणि जनतेच्या प्रश्नांवरील चर्चेवर होतो. त्यामुळे आगामी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्पर संवादातून मार्ग काढून संसदेचे कामकाज सुरळीत ठेवावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.