
no images were found
आनंद तेलतुंबडेंचा जामीन कायम, याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
नवी दिल्ली : ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद तेलतुंबडेंना दिलेला जामीन सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. जामिनाला स्थगिती देण्याची राष्ट्रीय तपास यंत्रणे ची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ही सुनावणी झाली.
राष्ट्रीय तपास संस्थेने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या जामीनाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. १८ नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टाने भीमा कोरेगाव प्रकरणात तेलतुंबडे यांना जामीन दिला होता. NIA च्या विनंतीवरून हायकोर्टाने या आदेशावर एक आठवडा स्थगिती दिली होती. लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टानं एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात १४ एप्रिल २०२० मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. प्रा. तेलतुंबडे यांना अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये (UAPA) अटक करण्यात आली होती.
३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेचे संयोजक प्रा. आनंद तेलतुंबडे होते, असा आरोप एनआयएनं ठेवला होता. या परिषदेनंतर भीमा कोरेगाव दंगल झाल्याचा आरोप आहे. या दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. खंडपीठाने असंही म्हटलं की NIA ला तेलतुंबडे यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी फक्त कलम 39 आणि 39 (दहशतवादी संघटनांशी संबंध) दाखवता आले आहेत. या गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त शिक्षा 10 वर्षे आहे, तेलतुंबडे आत्तापर्यंत 2 वर्षे तुरुंगात आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना जामीन देण्यासाठी ही योग्य केस आहे असं न्यायालयाने म्हटलं. याआधी याच प्रकरणातील वरवरा राव यांना वैद्यकीय कारणासाठी आणि सुधा भारद्वाज यांनाही मुंबई हायकोर्टानं जामीन दिलाय.