no images were found
अभिनेत्री अमृता धोंगडे पाटीलचं दोन वर्षांनंतर मालिका विश्वात दमदार पुनरागमन
अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता धोंगडे तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहवर १० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या नव्या मालिकेत अमृता दर्शना लाड या खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दर्शना लाड उर्फ लाडबाई ही नावाप्रमाणेच गोड बोलणारी, पण तितकीच धूर्त आणि कपटी स्वभावाची आहे. एका राजकीय पक्षाच्या वतीने गावातील जमिनींवर कब्जा मिळवण्याचं मिशन घेऊन ती गावात येते. आपल्या गोड बोलण्याने आणि चलाख डावपेचांनी लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात ती पटाईत आहे. नाईक बाईंच्या आयुष्यात नवनवे अडथळे निर्माण करत, त्यांच्यासमोर आव्हानांचं मोठं वादळ उभं करण्याचं काम लाडबाई करणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री अमृता धोंगडे पाटील म्हणाली, ‘दोन वर्षांनंतर पुन्हा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येताना खूप उत्सुकता वाटते आहे. ‘दर्शना लाड’ ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. ती गोड बोलते, पण तिच्या प्रत्येक कृतीमागे एक वेगळा हेतू असतो. पहिल्यांदा खलनायिका साकारतेय. अशा ग्रे शेड्स असलेल्या व्यक्तिरेखा साकारण्याची एक वेगळीच मजा असते. प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल अशी आशा आहे.’तेव्हा पाहायला विसरू नका ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ १० ऑगस्टपासून सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.