Home निधन वार्ता समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

2 second read
0
0
6

no images were found

समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला:शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, :- शिक्षण, सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व पद्मश्री डॉ डी. वाय पाटील यांच्या निधनाने काळाने हिरावून नेले आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. पाटील यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले आहे.

    शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. पाटील यांनी ज्ञानदेव या आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली. शिक्षण क्षेत्रालाच आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सुमारे दोनशे संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थी, असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. विशेषत: वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समुहासोबतच महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला. या महाविद्यालयांच्या माध्यमातून वैद्यकीय सोयी सुविधा आणि आरोग्य सेवेचे जाळे विस्तारले. राजकारणातही त्यांनी काम केले. ते दोनदा विधानसभा सदस्य होते. पण डॉ. पाटील रमले शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात. यातून त्यांनी अनेक भव्य दिव्य अशी शैक्षणिक संकुले, डॉ डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखे प्रकल्पही साकारले. डॉ. पाटील हे सहकार, शिक्षण, सांस्कृतिक – साहित्यिक आणि सामाजिक चळवळीचे आधारवड होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये जपली. ‘अहंकार म्हणजे जीवनाचा मृत्यू; तर अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरे जीवन’ हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे प्रतिबिंब होता. आज त्यांचे पार्थिव अस्तित्व आपल्यात नसले, तरी त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, विनम्रतेचा आदर्श आणि समाजहिताची मूल्ये कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या जाण्याने एका दूरदर्शी शिक्षणमहर्षीचा अंत झाला असला, तरी त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील. डॉ डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्याशी निगडित अनेक समुह, संस्थांवर शोकमग्न झाल्या आहेत. डॉ. पाटील यांच्या परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे, या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता
Comments are closed.

Check Also

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून डॉ. डी वाय पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून डॉ. डी वाय पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! डी. …