
no images were found
२८ नोव्हेंबरपासून सोनी मराठीवर नवी मालिका- आशीर्वाद तुझा एकवीरा आई
मुंबई : सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. समकालीन मालिकांबरोबरच ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता एकवीरा आईचा महिमा दाखवणारी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेवून येत आहे. एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे. आगारी कोळी समाजासह अन्य लोकांचेही हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेतील कलाकारांनी कार्ला (लोणावळा) येथे एकवीरा आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या नंतर आयोजित पत्रकार परिषदेस एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, लेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी फ़िकशन हेड – सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या मालिकेची निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि लेखक, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्या मुळाक्षर प्रॉडक्शनने केली आहे. विशेष म्हणाले चिन्मय मांडलेकर स्वतः या मालिकेचे लेखन करत आहेत. या मालिकेचे दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेले शीर्षक गीत अतिशय सुंदर झाले आहे. हे गीत केवल वाळंज आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले आहे. या मालिकेत एकवीरा आई आणि तिच्या भक्तांचे अतूट नाते बघायला मिळणार आहे.