no images were found
एईएसएलची आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी
निव्वळ नफ्यात (पीएटी) 130 टक्क्यांची वाढ, नफा 1,237 कोटी रुपयांवर पोहोचला
अहमदाबाद,: अदाणी समूहातील अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (एईएसएल) या भारतातील सर्वात मोठ्या खासगी वीज ट्रान्समिशन, वीज वितरण डिस्ट्रीब्यूशन, स्मार्ट मीटरिंग आणि ऊर्जा उपाय (एनर्जी सोल्युशन्स) देणाऱ्या कंपनीने 30 जून 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक आणि कार्यात्मक कामगिरीची घोषणा केली.
अदाणी एनर्जी सोल्युशन्स (एईएसएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कंदर्प पटेल म्हणाले, “आर्थिक वर्ष 2026-27 ची सुरुवात आमच्यासाठी अत्यंत दमदार ठरली आहे. आमच्या प्रमुख व्यवसायांतील उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि मजबूत आर्थिक निकालांमुळे कंपनीने वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली आहे. या तिमाहीत इंटेलीस्मार्टच्या प्रस्तावित अधिग्रहणाद्वारे आम्ही आमचा विकासाचा पाया अधिक मजबूत केला आहे. भारतातील आघाडीचे स्मार्ट मीटरिंग प्लॅटफॉर्म उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे आणि धोरणात्मक पाऊल आहे. आमच्या एनर्जी सोल्युशन्स प्लॅटफॉर्मनेही आता वेग पकडला आहे. नवीकरणीय ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांमुळे तसेच वीज वितरण कंपन्या (युटिलिटी), व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्र आणि डेटा सेंटरमधील वाढत्या ग्राहकांमुळे या व्यवसायाला चांगला आधार मिळाला आहे. मजबूत प्रकल्पांची पाइपलाइन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि सक्षम आर्थिक व्यवस्थापनाच्या बळावर आम्हाला विश्वास आहे की, आम्ही सातत्यपूर्ण विकास साधत सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करत राहू.”
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने दमदार आर्थिक कामगिरी नोंदवत एकूण उत्पन्नात 40 टक्क्यांची वाढ केली. कंपनीचे एकूण उत्पन्न 9,852 कोटी रुपयांवर पोहोचले, तर परिचालन महसूल 54 टक्क्यांनी वाढून 7,117 कोटी रुपये झाला. याच कालावधीत ऑपरेटिंग ईबीआयटीडीए (EBITDA) 70 टक्क्यांनी वाढून 2,779 कोटी रुपये झाला, तर एकूण ईबीआयटीडीए 58 टक्क्यांच्या वाढीसह विक्रमी 3,178 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीचा निव्वळ नफा (PAT) देखील 130 टक्क्यांच्या उल्लेखनीय वाढीसह 1,237 कोटी रुपये नोंदवण्यात आला. मुंबई एचव्हीडीसी (HVDC) प्रकल्पाच्या कार्यान्वयनामुळे, स्मार्ट मीटरिंग व्यवसायाच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे आणि एनर्जी सोल्यूशन्स प्लॅटफॉर्मच्या वाढत्या योगदानामुळे या मजबूत कामगिरीला मोठा हातभार लागला.
विभागनिहाय कामगिरी पाहता, ट्रान्समिशन व्यवसायाने उल्लेखनीय वाढ नोंदवली. या विभागाचा परिचालन महसूल 36 टक्क्यांनी वाढून 1,596 कोटी रुपये झाला, तर ऑपरेटिंग ईबीआयटीडीए 38 टक्क्यांनी वाढून 1,477 कोटी रुपये झाला. सरासरी प्रणाली उपलब्धता 99.6 टक्के इतकी कायम राहिली. वितरण व्यवसायात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) आणि एमपीएसईझेड (मुंद्रा) युटिलिटी लिमिटेड (MUL) यांनीही स्थिर कामगिरी केली. मुंबईतील वीज विक्री 11 टक्क्यांनी वाढून 3,260 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचली, तर मुंद्रामध्ये ती 57 टक्क्यांनी वाढून 425 दशलक्ष युनिट्स झाली. तसेच, वीजपुरवठ्याची विश्वासार्हता 99.99 टक्क्यांच्या उच्च स्तरावर कायम राहिली.
स्मार्ट मीटरिंग व्यवसायानेही उत्कृष्ट कामगिरी केली. या विभागाचा परिचालन महसूल 136 टक्क्यांनी वाढून 347 कोटी रुपये झाला, तर ऑपरेटिंग ईबीआयटीडीए 141 टक्क्यांनी वाढून 311 कोटी रुपये झाला. आतापर्यंत कंपनीने 13.44 दशलक्ष स्मार्ट मीटरची स्थापना केली आहे. याशिवाय, इंटेलीस्मार्टच्या प्रस्तावित अधिग्रहणानंतर कंपनी 4.7 कोटींहून अधिक स्मार्ट मीटरच्या पोर्टफोलिओसह देशातील सर्वात मोठे स्मार्ट मीटर प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. एनर्जी सोल्यूशन्स प्लॅटफॉर्मने 1,839 कोटी रुपयांचा परिचालन महसूल नोंदवला असून, कंपनीने सुमारे 4 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता, 3.3 गिगावॅट-तास बॅटरी ऊर्जा साठवण क्षमता आणि 1 गिगावॅटपेक्षा अधिक ऊर्जा पोर्टफोलिओ विकसित केला आहे.
भविष्यातील वाढीच्या दृष्टीने कंपनीकडे 71,779 कोटी रुपयांच्या 13 ट्रान्समिशन प्रकल्पांची मजबूत पाइपलाइन आहे, तर निकट भविष्यात सुमारे 1.1 लाख कोटी रुपयांच्या ट्रान्समिशन निविदांच्या संधी उपलब्ध आहेत. ईएसजी (ESG) क्षेत्रातही कंपनीने उल्लेखनीय यश मिळवले आहे. ईएसजी रिस्क असेसमेंट्स अँड इनसाइट्स लिमिटेडने कंपनीचे ईएसजी रेटिंग ‘स्ट्राँग’ वरून ‘एक्सलंट’ श्रेणीत उंचावले आहे. तसेच, सस्टेनेलिटिक्सच्या ईएसजी रिस्क रेटिंगमध्ये सुधारणा झाल्यामुळे कंपनी जगातील अव्वल 7 टक्के इलेक्ट्रिक युटिलिटी कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. याशिवाय, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने आरईसीच्या कंझ्युमर सर्व्हिस रेटिंग ऑफ डिस्कॉम्स (CSRD) मध्ये A+ रेटिंगसह देशातील सर्वोच्च क्रमांकाची वीज वितरण कंपनी म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.