no images were found
दहावीतल्या विद्यार्थ्याने अभ्यास टाळण्यासाठी केला मित्राचा खून
गाझियाबादः अभ्यास टाळण्यासाठी तुरुंगात जाण्याकरिता १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने १३ वर्षांच्या मुलाची बिअरच्या बॉटलने गळा चिरुन हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. या हत्येचं कारण ऐकून पोलिसही चिंतेत पडले आहेत.
दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या खालील बाजूस गाझियाबाद येथे १३ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला होता. मुलाच्या तोंडातून फेस येत होता. महामार्गावरुन जाणाऱ्या लोकांनी याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने आरोग्य केंद्रात घेऊन गेले. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. मयत मुलाचे नाव नीरज असून तो आठवीच्या वर्गात शिकत होता. या प्रकरणी पोलिसांनी १६ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.
नीरजच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जवळपास दोनच्या सुमारास नीरज आरोपी किशोरसोबत फिरायला म्हणून बाहेर पडला होता. आरोपी आणि मयत युवकाची काही दिवसांपूर्वीच मैत्री केली होती. दोघंही गेल्या ३-४ दिवसांपासून हायवेच्या किनारी फिरायला जात असत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इयत्ता दहावीत शिकतो. व अभ्यासात फारसा हुशार नसल्याने त्याने ही हत्या घडवून आणली आहे. खुनाच्या आरोपांनंतर तो तुरुंगात व तिथे त्याला बालसुधार गृहात ठेवलं जाईल जेणेकरुन त्याला अभ्यास करावा लागणार नाही. विद्यार्थ्यांच्या हा जबाब ऐकून पोलिसही चिंतेत पडले आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर मयत युवकाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. पोस्टमार्टमचे रिपोर्ट समोर आल्यावर आणखी काही गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.