no images were found
शिवाजी विद्यापीठासाठी लवकरच स्वतंत्र एआय प्रणाली: कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांची घोषणा
प्रशासन, अध्यापन आणि संशोधनाला लाभणार आधुनिकतेचे बळ
कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित अशी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रणाली लवकरच विकसित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केली. प्रशासन, अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थी-सुविधा या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये ही प्रणाली उपयुक्त ठरणार असून, विद्यापीठाच्या कार्यपद्धतीला अधिक वेग, अचूकता आणि कार्यक्षमतेची दिशा मिळणार आहे.
शिवाजी विद्यापीठात आज विद्यापीठातील सर्व अधिकारी, अधिष्ठाता, संचालक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी एआयच्या वापराबाबत विशेष कार्यशाळा झाली. त्यावेळी कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. कार्यशाळेत टाटा कम्युनिकेशन्स लि. कंपनीचे वरिष्ठ एआय अधिकारी बळवंत गोरड यांनी मार्गदर्शन केले. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, विद्यापीठातील बैठका, अधिकृत टिपण्या, नियमावली, अधिनियम, अध्यादेश, तसेच विविध प्रशासकीय नोंदींचे विश्लेषण करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होतो. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एआयचा वापर केल्यास संबंधित कागदपत्रांचे पिन-पॉईंट विश्लेषण, संदर्भाधारित नोंदी, नियमांची पडताळणी आणि आवश्यक ते संदर्भ स्वयंचलितपणे उपलब्ध होऊ शकतील. ही प्रणाली पूर्णपणे शिवाजी विद्यापीठाच्या सर्व्हरवर कार्यरत राहणार असल्याने डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि संस्थात्मक माहितीचे संरक्षण यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सार्वजनिक एआय साधनांच्या तुलनेत ही व्यवस्था विद्यापीठाच्या गरजांनुसार सानुकूलित असेल. विशेषतः विद्यापीठाचे अंतर्गत नियम, अधिनियम आणि इतर अप्रकाशित माहितीही या प्रणालीमध्ये समाविष्ट करता येणार आहे.
डॉ. कामत यांनी सांगितले की, या एआय प्रणालीचा उपयोग केवळ प्रशासनापुरता मर्यादित न राहता अध्यापन- अध्ययन प्रक्रियेतही होईल. विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासक्रम, संदर्भग्रंथ, प्रकल्प सूचना आणि संशोधन साधने यांचा योग्य वेळी लाभ मिळू शकेल. याशिवाय फ्लिप्ड क्लासरूम, ओपन एज्युकेशन मॉडेल, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि संशोधनासाठीची स्वतंत्र डिजिटल लायब्ररी या संकल्पनांनाही यामुळे बळ मिळणार आहे. या उपक्रमामुळे कामाचा ताण कमी होऊन निर्णयप्रक्रिया जलद होईल, उत्पादकता वाढेल आणि प्रशासन अधिक पारदर्शक व परिणामकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाचे तांत्रिक पथक, आयटी सेल आणि संबंधित तज्ज्ञांच्या सहकार्याने विकसित होणारी ही प्रणाली विद्यापीठाच्या डिजिटल परिवर्तनातील महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शैक्षणिक संस्थांसाठी एआय अत्यंत उपयुक्त: बळवंत गोरड
कार्यशाळेत बळवंत गोरड यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) उपयुक्ततेवर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या जगातील भारताची आर्थिक व तांत्रिक स्थिती स्पष्ट करताना शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून देशाचा विकास कसा वेगाने होऊ शकतो, हे सविस्तर मांडले. विशेषतः शैक्षणिक संस्थांसाठी एआय प्रणाली अत्यंत उपयुक्त असून विद्यापीठांतील प्रशासकीय कामकाज, कागदपत्र प्रक्रिया, नियामक अनुपालन, संशोधन, परीक्षा, वित्त, मानव संसाधन आणि विद्यार्थीसेवा यांसारख्या विविध विभागांमध्ये तो प्रभावी ठरू शकतो. चॅटजीपीटीसारखी साधने ही एआयची केवळ उदाहरणे असून, संस्थेच्या स्वतःच्या डेटासह स्थानिक सर्व्हरवर एलएलएम आधारित प्रणाली उभारल्यास गोपनीयता जपली जाऊ शकते, असे स्पष्ट केले. सर्क्युलरचे सारांश, महत्त्वाचे मुद्दे, कृतीसूची तयार करणे, मीटिंगचे इतिवृत्त, पत्रलेखन, बजेट विश्लेषण, टेंडर ड्राफ्टिंग, नॅक, एनआयआरएफ इत्यादींसाठी एसएसआर निर्मिती व दस्तऐवजीकरण यांसारखी कामे अल्पावधीत कशी करता येतील, हे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले.
यावेळी अॅकॅडमी ऑफ अॅकॅडेमिक अॅडमिनिस्ट्रेशनचे समन्वयक डॉ. केदार मारुलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुहासिनी पाटील यांनी आभार मानले.