no images were found
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाद्वारे प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर: एकाच दिवशी ३०० हून अधिक गावांमध्ये संपन्न
कोल्हापूर : कार्यालयातून बाहेर पडून प्रशासनाने थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीत राबण्याचा ऐतिहासिक प्रसंग आज कोल्हापूरकरांनी अनुभवला. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” या लोकोन्मुखी उपक्रमाला आज जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांमध्ये अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड तालुक्यामधील मसोली गावामध्ये थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, चिखलणी व भात लावणी केली. खासदार धैर्यशील माने यांनी रुकडी येथे वृक्षारोपण केले. आमदार डॉ. अशोकराव माने यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी पन्हाळा तालुक्यामधील केकले गावामध्ये स्वतः चिखलणी लावणी केली, आंबा बागेची पाहणी केली, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. जॅसमिन यांनी राधानगरी तालुक्यामधील आवळी खु. गावामध्ये चारसूत्री भात लागवड, DAP खताचा योग्य वापर, पक्षी थांबे उभारणे या बद्दल शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहे.
चिखलणी व चार सुत्रीद्वारे भात लागवड, शासनाच्या ३०० कोटी वृक्ष लागवड अंतर्गत शेतकरी, शेतकरी गट, प्राथमिक शाळा यांच्या सहकार्याने वृक्ष लागवड, मागेल त्याला काजू कलमे अंतर्गत जिल्ह्यातील ४ तालुक्यांमध्ये लागवड उपक्रम, भात सोयाबीन भुईमुग पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत पिवळे चिकट सापळे लावणे व जैविक निविष्ठा प्रात्यक्षिकांची उभारणी. बियाणे उगवण क्षमता, बिजप्रक्रिया, खताचा कार्यक्षम वापर या बाबत जनजागृती प्रात्यक्षिक व प्रबोधन. शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी ‘महाविस्तार AI’ (Mahavistar AI) च्या वापराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि ‘Agristack’ अंतर्गत शेतकरी नोंदणीची धडक मोहीम राबविण्यात आली.
‘Framework for fertilizer sale’ या ऑनलाईन खत बुकिंग पथदर्शी प्रकल्पांतर्गत QR Code च्या माध्यमातून पारदर्शक खत खरेदीचे आधुनिक धडे शेतकऱ्यांना देण्यात आले. केवळ उत्पादन नव्हे, तर शेतमालाचे मूल्यवर्धन, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि थेट विक्री यासाठी PMFME, SMART व मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. PMKISAN, गोपीनाथ मुंडे सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आणि प्रधानमंत्री पीकविमा योजना यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या योजनांचे थेट बांधावर जाऊन मूल्यमापन व मार्गदर्शन करण्यात आले. एल-निनोच्या (El Nino) संभाव्य संकटावर मात करण्यासाठी मृद व जलसंधारण, आपत्कालीन पीक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सर्व विभागांचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वय अधिकारी म्हणून चोख भूमिका बजावली. संपूर्ण भव्य उपक्रमाचे संनियंत्रण जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. शासन आणि शेतकरी यांच्यातील संवादाची दरी मिटवणारा हा उपक्रम प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे एक उत्तम उदाहरण ठरला असून, बळीराजाच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश आहे.