Home Uncategorized बळीराजाच्या बांधावर जिल्हाधिकारी; चिखलणीसह केली भात रोपलावण

बळीराजाच्या बांधावर जिल्हाधिकारी; चिखलणीसह केली भात रोपलावण

22 second read
0
0
10

no images were found

बळीराजाच्या बांधावर जिल्हाधिकारी; चिखलणीसह केली भात रोपलावण: पन्हाळ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद; सेंद्रिय शेतीपासून एआय तंत्रज्ञानापर्यंत विविध प्रयोगांची पाहणी

 कोल्हापूर,  : पाय चिखलात… हातात भाताची रोपे आणि सोबत शेतकरी व अधिकारी… पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी केली आणि चारसूत्री पद्धतीने भाताची रोपे लावली. निमित्त होते जिल्हा प्रशासनाच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचे. दिवसभर शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत त्यांनी शेतीतील प्रयोग पाहिले, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि सेंद्रिय शेतीपासून आधुनिक एआय तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर त्यांच्याशी थेट संवाद साधला.

      सन २०२६-२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले आणि बांदिवडे या गावांची निवड केली. केवळ कार्यालयीन स्तरावर शेतीविषयक माहिती घेण्याऐवजी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांचे अनुभव, अडचणी आणि यशस्वी प्रयोग जाणून घेण्यावर या दौऱ्यात भर दिला.

     केखले येथे महिला शेतकऱ्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण भात लागवडीने दौऱ्याची सुरुवात झाली. पाणी फाउंडेशनअंतर्गत स्थापन झालेल्या ‘भगीरथी महिला शेती गटा’च्या अश्विनी पाटील यांच्या शेताला जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी भेट दिली. महिला शेतकऱ्यांनी एसओपीप्रमाणे तसेच निसर्गपूरक पद्धतीने केलेल्या पैरे लागवडीची माहिती त्यांना दिली. या पद्धतीमुळे उत्पादनात शंभर टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे महिलांनी सांगितले.

     केखलेतील शिवारात सेंद्रिय शेतीचे आणखी एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. ‘ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेती गटा’च्या उपक्रमाची सुरुवात गोपूजनाने झाली. प्रगतशील शेतकरी जयवंत मगदूम, कुंडलिक पाटील आणि आनंदराव पाटील यांनी गोकृपामृत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती, त्यांचा वापर आणि शेतीवरील परिणाम याविषयी माहिती दिली.

     विशेष म्हणजे, हा शेतकरी गट केवळ सेंद्रिय उत्पादनापुरता मर्यादित राहिलेला नाही. सेंद्रिय हळद, गूळ पावडर, काकवी, खपली गहू आणि तांदूळ अशा विविध उत्पादनांसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था उभारण्यात आली आहे. शेतीमालाच्या उत्पादनाबरोबरच त्याच्या मूल्यवर्धन आणि बाजारपेठेवर भर देणाऱ्या या प्रयत्नांचे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी विशेष कौतुक केले.

      दुपारनंतर दौऱ्याचा केंद्रबिंदू ठरले बांदिवडे येथील ‘देवगिरी फार्म’. येथे एकाच बागेत असलेल्या २१ विविध जातींच्या आंब्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. विविधता जपणाऱ्या या फळबागेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी परिसरातील भाताच्या शेताला भेट दिली आणि स्वतः शेतीकामात सहभाग घेतला.

    शेतात उतरून जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी चिखलणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत चारसूत्री पद्धतीने भाताची रोपे लावली. प्रशासनातील सर्वोच्च जिल्हास्तरीय अधिकारी आपल्यासोबत प्रत्यक्ष शेतात काम करत असल्याचे पाहून उपस्थित शेतकऱ्यांमध्येही उत्साह निर्माण झाला.

    याच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी १४ प्रकारच्या भात वाणांची माहिती जाणून घेतली. पारंपरिक वाणांचे संवर्धन, त्यांची वैशिष्ट्ये आणि उत्पादनक्षमता याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच मातीपासून उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक घराच्या संकल्पनेची पाहणी करून या अभिनव प्रयोगाची माहिती घेतली.

    शेतीतील पारंपरिक ज्ञानासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही या दौऱ्यात चर्चेचा महत्त्वाचा विषय ठरला. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी ‘कृषी विस्तार एआय ॲप’ आणि ‘फर्टिलायझर सेल ॲप’ यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक माहिती अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने कशी पोहोचवता येईल, याबाबतही चर्चा करण्यात आली.

     शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांमुळे शेतीपिकांना होणाऱ्या नुकसानीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. या समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन डॉ. राठोड यांनी दिले. सेंद्रिय शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रभावी मार्केटिंग करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना अधिक चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी आवश्यक बाबींवरही त्यांनी मार्गदर्शन केले.

     दिवसभर चाललेल्या या उपक्रमातून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या श्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. महिला बचत गटांची प्रयोगशीलता, सेंद्रिय शेतीतील नावीन्य, पारंपरिक पिकांचे संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या अशा विविध पैलूंचा या दौऱ्यात समावेश होता. त्यामुळे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम केवळ पाहणी दौरा न ठरता प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील थेट संवादाचा प्रभावी दुवा ठरला.

     या प्रसंगी तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, उपविभागीय कृषी अधिकारी पाटील, नायब तहसीलदार विजय जाधव, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, मंडल कृषी अधिकारी अभिलाषा गायकवाड, सुहास पाटील यांच्यासह कृषी, आत्मा व उमेद विभागाचे अधिकारी-कर्मचारी, दोन्ही गावांचे सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एसआयआर मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सन्मान

एसआयआर मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्त…