no images were found
85 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरीच मतदान करण्याची सुविधा
कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या मतदारांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे तसेच ज्या दिव्यांग मतदारांचे अपंगत्व हे 40 टक्के व त्यापेक्षा अधिक आहे अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेव्दारे त्यांच्या घरीच मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणुकीची घोषणा झालेल्या दिनांकापासून नमुना 12 ड चे संबंधित मतदारांना BLO मार्फत घरोघरी वाटप केले जात असून, हे अर्ज भरुन 27 ऑक्टोबर 2024 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पोहोचणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग मतदार यांनी नमुना १२ ड सोबत आपले अपंगत्व हे 80 टक्के व त्यापेक्षा अधिक असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे. या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा मतदानाचे तीन दिवस अगोदरपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल. मतदारांच्या घरी येवून टपाली मतदान घेण्यासाठीची तारीख व वेळ याची माहिती BLO यांच्यामार्फत कळविण्यात येईल. परंतु 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना व 80 टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जावून मतदान करावयाचे असल्यास ते मतदार मतदान केंद्रावर जावून मतदान करण्याचा पर्याय निवडू शकतात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.