no images were found
जिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री 11 नंतर बंद करण्याचे आदेश जारी
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आज दि. 21 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, बार, परमिट रुम, देशी, विदेशी दारु दुकाने रात्री 11 नंतर बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
निवडणूक कालावधीत मतदारांना आमिषे दाखविण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुचे वाटप व जेवणावळींचे आयोजन केले जाते. ब-याच वेळा सांकेतिक चिन्ह, शब्द यांचा वापर करुन परस्पर मतदार, कार्यकर्ते यांची हॉटेल, बार, परमिट रुम याठिकाणी मोठ्या प्रमाणात सोय केली जाते. त्यामध्ये गोपनियता पाळली जाते. सर्वसामान्यत: रात्री 10 नंतर प्रचार समाप्त झाल्यानंतर उशिरापर्यंत कार्यकर्ते व मतदार यांची हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, बार, परमिट रुम, दारु दुकाने आदी ठिकाणी सोय केली जाते. अशा आस्थापना रात्री उशीरा पर्यंत सुरु राहिल्यास पक्ष संघटनेचे कार्यकर्ते हे या ठिकाणी रात्री उशीरा जाऊन मद्य प्राशन व भोजन करतात त्यानंतर त्या ठिकाणी पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये व गटागटामध्ये संघर्ष किंवा वादावादी होऊन मारामारी होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. तसेच अशा ठिकाणी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, राजकीय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, समाज विघातक प्रवृत्ती यांचा मोठ्या प्रमाणात वावर होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन आदर्श आचारसंहितेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तसेच विविध कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबर आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीमध्येही अडथळे निर्माण होतात. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे व प्रभावीपणे पालन करण्यासाठी रात्री उशीरा पर्यंत सुरु राहणा-या कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट, परमिट रुम, बार व देशी/विदेशी दारु दुकाने अशा आस्थापनांवर या आदेशान्वये वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करुन कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे प्रशासनास सोईचे होण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत सुरु राहणा-या जिल्ह्यातील हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट, परमिट रुम, बार व देशी/विदेशी दारु दुकाने अशा आस्थापनांवर वेळेचे निर्बंध घालण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मध्ये नमुद तरतुदीच्या अनुषंगाने हा आदेश लागू करण्यात आला आहे.