no images were found
एसआयआर मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सन्मान
कोल्हापूर, : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन प्रगणना अर्जांचे वाटप, संकलन आणि बीएलओ ॲपद्वारे 100 टक्के डिजिटायझेशनचे उल्लेखनीय काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (BLO) सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या सर्व बीएलओंचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्राचे वितरण करून अभिनंदन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह बीएलओ अधिकारी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रगणना अर्जांचे वाटप करणे, भरलेले अर्ज गोळा करणे आणि प्राप्त अर्जांचे बीएलओ ॲपमध्ये डिजिटायझेशन करणे ही जबाबदारी बीएलओंकडून पार पाडली जात आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील आठ बीएलओंनी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या सर्व प्रगणना अर्जांचे 100 टक्के डिजिटायझेशन पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातील बरगेवाडी येथील अंगणवाडी सेविका शितल संदिप पाटील, भुदरगड तालुक्यातील देवकेवाडी येथील कृषी सहाय्यक अमित शिवाजी सुतार, भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी विनोद तुकाराम गुरव, राधानगरी तालुक्यातील हणबरवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी विवेक बाळासो पाटील, करवीर विधानसभा मतदारसंघातील शेळकेवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा निवास आवाड, पाटेकरवाडी येथील ग्रामपंचायत लिपिक सुभाष शंकर पाटील, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील शिरढोण येथील अंगणवाडी सेविका छाया सुरेश मोरडे व अंगणवाडी सेविका अलका सागर बिरोजे यांनी प्रगणना अर्जांचे वाटप, संकलन आणि बीएलओ ॲपमध्ये डिजिटायझेशन पूर्ण करून 100 टक्के कामगिरी नोंदविली.
जिल्ह्यात 25 लाख 96 हजारांहून अधिक प्रगणना अर्जांचे वाटप
कोल्हापूर जिल्ह्यात SIR कार्यक्रमांतर्गत 3 हजार 450 बीएलओ कार्यरत असून सर्व बीएलओंचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एकूण 33 लाख 55 हजार 244 मतदार असून सर्व 33 लाख 55 हजार 244 प्रगणना अर्जांची छपाई पूर्ण करण्यात आली आहे. दि. 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 25 लाख 96 हजार 343 प्रगणना अर्जांचे वाटप करण्यात आले असून हे प्रमाण 77.38 टक्के आहे. आतापर्यंत 8 लाख 1 हजार 694 अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण 23.89 टक्के आहे.
SIR मोहिमेतील या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व आठ बीएलओंचे अभिनंदन केले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक बीएलओने जबाबदारीने काम करावे तसेच नागरिकांनीही बीएलओंना आवश्यक सहकार्य करून आपले प्रगणना अर्ज वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहनही करण्यात आले.