no images were found
एसआयआर अभियान राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा : भगवानदास सबनानी
कोल्हापूर, : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियान हा मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व विश्वासार्ह करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा असून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त हरकती व दावे नोंदवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य एसआयआर प्रभारी तथा भोपाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार भगवानदास सबनानी यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात कोल्हापूर महानगर, कोल्हापूर पूर्व व कोल्हापूर पश्चिम या संघटनात्मक जिल्ह्यांच्या एसआयआर अभियानाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा प्रभारी विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महापौर रूपाराणी निकम, विराज चिखलीकर, अमर साठे, माधुरी नकाते तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भगवानदास सबनानी यांनी विधानसभा निहाय नियुक्त बीएलए-२ यांच्या कामाचा तसेच बीएलओ-१ यांच्या समन्वयाचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत तिन्ही संघटनात्मक जिल्ह्यांच्या अध्यक्षांना आवश्यक सूचना दिल्या. अभियानाचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करत त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतः या कामात लक्ष घालण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी मतदार यादीतील दुबार नावे, मयत मतदार, स्थलांतरित मतदार तसेच अन्य त्रुटी दूर करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६, ७, आणि ८ यांचा अभ्यास करून चुकीच्या मतदारांसाठी आवश्यक त्या हरकती व दावे वेळेत सादर करण्याचे आवाहन केले. मतदार यादी शुद्ध व अचूक करण्याचे हे अभियान केवळ निवडणुकांच्या दृष्टीनेच नव्हे, तर राष्ट्रहितासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार धनंजय महाडिक यांनी आभार प्रदर्शन करताना कोल्हापूर जिल्ह्यात एसआयआर अभियान अधिक प्रभावीपणे आणि व्यापक स्वरूपात राबविण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या एसआयआर अभियानाच्या कामाचा आढावा सादर केला.
यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.