no images were found
शिवाजी विद्यापीठात गुरुवारी पूर परिस्थिती मॉडेलिंगवरील राष्ट्रीय कार्यशाळा
कोल्हापूर, (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचा भूगोल अधिविभाग, हवामान बदल व शाश्वतता अध्ययन केंद्र, अक्वास्फिअर क्लब आणि सिग्मा इन्फ्राप्लॅन इंजिनिअरिंग प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने “Flood Modeling Using HEC-RAS” या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन येत्या गुरूवारी (दि. २ जुलै) करण्यात आले आहे. कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून देशभरातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, अभियंते, जलसंपदा तज्ज्ञ तसेच भू-अवकाशीय तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे.
हवामान बदल, अतिवृष्टी आणि वाढते शहरीकरण यांमुळे पूर परिस्थितीचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत आहे. संभाव्य पूरग्रस्त क्षेत्रांचा अंदाज घेणे, पूर व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करणे आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत पूर परिस्थितीचे वैज्ञानिक विश्लेषण, नदी प्रवाहाचे संगणकीय अनुकरण (Simulation), पूर क्षेत्रांचे नकाशीकरण आणि पूर व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे.
कार्यशाळेत सहभागींना HEC-RAS या आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 1D आणि 2D पूर परिस्थिती मॉडेलिंगचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये डिजिटल उंची नमुना (DEM), नदी प्रवाह माहिती, पूर अनुकरण प्रक्रिया, पूर विस्तार नकाशे तयार करणे तसेच विविध पूर परिस्थितींचे विश्लेषण यांसारख्या बाबींचा समावेश असेल.
या कार्यशाळेसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलसंपदा व पूर परिस्थिती विश्लेषण विषयातील तज्ज्ञ अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. वेंकटेश मेरवाडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, राष्ट्रीय जलविज्ञान संस्था (NIH), प्रादेशिक केंद्र, बेळगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. अभिलाष आर. हे तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. पूर व्यवस्थापन, नदी अभियांत्रिकी, भू-अवकाशीय तंत्रज्ञान आणि संगणकीय मॉडेलिंग या क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवाचा लाभ सहभागींना मिळेल. जीआयएस रिमोट सेन्सिंग, जलसंपदा व्यवस्थापन, पर्यावरणशास्त्र, भूगोल, नागरी अभियांत्रिकी तसेच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
सहभाग विनामूल्य असला तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळेचे स्वरूप प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष प्रशिक्षणावर आधारित असल्याने जागा मर्यादित आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन कार्यशाळेचे संयोजक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी केले आहे.