no images were found
भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांचं अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये रूपांतर
वर्कशॉप कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीला महापौर आयुक्तांकडून शाबासकी
कोल्हापूर, : “टाकाऊतून टिकाऊ” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागाने एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी २०१६ साली घेतलेल्या आणि सध्या भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांना वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कौशल्याने नवसंजीवनी दिली. या गाड्यांचे रूपांतर आता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी उपयुक्त अशा ट्रकमध्ये करण्यात आले असून, सहा दिवसांच्या विक्रमी वेळेत त्या रस्त्यावर कार्यरत झाल्या आहेत.
विशेष म्हणजे या संकल्पनेचे जनक स्वतः आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड हेच आहेत. आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी कार्यशाळा विभागास भेट दिली त्यावेळी या गाडया भंगारात न घालता याचा अतिक्रमणासाठी वापर करता येईल का याची कल्पना मांडली. त्यानुसार सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील व कार्यशाळा विभागाचे प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी गेले आठवडाभर अहोरात्र आणि सुट्टीच्या दिवशीही काम करून या गाड्या दुरुस्त केल्या. भंगारात निघालेल्या गाड्यांचं इंजिन, बॉडी, हायड्रोलिक सिस्टीम अशा सर्व बाबी वर्कशॉपमध्येच दुरुस्त करून अतिक्रमण हटाव कारवाईसाठी आवश्यक त्या रचनेत बदल करण्यात आले.
या नूतनीकरण्यात आलेल्या गाड्यांचे उद्घाटन महापौर सौ.रुपाराणी निकम व महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी कार्यशाळा विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या उद्घाटनानंतर बोलताना महापौर सौ.रुपाराणी निकम म्हणाल्या, “डॉ.विजय पाटील, संजय भोसले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. कोणतेही काम अशक्य नसते हे महापालिकेच्या वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. याचे अनुकरण इतर विभागातील कर्मचाऱ्यांनीही करावे. पैशांची बचत आणि संसाधनांचा योग्य वापर याचा हा उत्तम नमुना आहे.”
आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी यावेळी वर्कशॉप विभागाचे कौतुक करताना म्हणाले “भंगारात निघालेल्या गाड्यांमधून अतिक्रमण निर्मूलनासाठी उपयुक्त वाहने तयार करणे ही ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी आहे. कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तळमळ आणि कौशल्य कौतुकास्पद आहे. यामुळे महापालिकेचा मोठा खर्च वाचला आहे.”
कार्यशाळा विभागाने आता आणखी दोन भंगार गाड्या अशाच स्वरूपात दुरुस्त करून एकूण चार वॉर्ड ऑफिसला चार अतिक्रमण निर्मूलन वाहने उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला अधिक गती मिळणार आहे. त्यामुळे नवीन गाडी खरेदीवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा वापर करून महापालिकेने आर्थिक बचती सोबत कर्मचाऱ्यांच्या कौशल्यालाही वाव दिला आहे.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, कार्यशाळा प्रमुख संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे व कार्यशाळा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.