Home निधन वार्ता शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

2 second read
0
0
17

no images were found

शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर, : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात आणि साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर गोंडोली येथे झाले होते, तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयातून पूर्ण केले होते. देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि अहिल्यानगर येथे आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ मध्ये राजस्थानमधील सुरतगड येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली, तर दुसरी नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे झाली होती. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील उरी येथे ८ आरआर (राष्ट्रीय रायफल्स) मध्ये देशसेवा बजावत होते.

शहीद जवान विक्रम चव्हाण यांचे पार्थिव मूळ गावी गोंडोली येथे आणण्यात आल्यानंतर, ‘वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरमधून तालुक्यात जाताना आणि गावात असंख्य लोकांनी त्यांच्या योगदानाला अभिवादन करत पुष्पवृष्टी केली. पार्थिव काही काळ घरी ठेवण्यात आले; त्यानंतर वारणा नदीच्या तीरावर लष्कराच्या आणि पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून या वीर सुपुत्राला अंतिम सलामी दिली आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, सभापती प्रियांका भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी, सैन्यदलाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील माजी सैनिक आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक या वीर सुपुत्राला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

विक्रम चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबातील कमावता आणि हसताखेळता आधार हिरावला गेल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी वीरा असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी चिमुकल्या वीराच्या आणि पत्नीच्या आक्रोशाने उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता
Comments are closed.

Check Also

अनधिकृत अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

अनधिकृत अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करा – आयुक्…