no images were found
दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोल्हापूर : नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ ची सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग विशेष शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदमयी वातावरणात सुरु करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांमार्फत त्यांचे औक्षण करुन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक साधने आणि पाठ्यपुस्तके व चॉकलेट देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग विशेष शाळांमध्ये अशाच पद्धतीने शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात, आनंदात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. याप्रसंगी पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन वाटपही करण्यात आले.
सर्व दिव्यांग शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी एकत्रित येऊन ‘नशामुक्त कोल्हापूर अभियानाची’ सामूहिक शपथ घेतली. या अभिनव उपक्रमादरम्यान जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी दिल्या. यामध्ये प्राथमिक स्वरुपात शहरातील स्वयंम बौद्धिक अक्षम मुलांची शाळा, वि. म. लोहिया मूकबधिर विद्यालय, कोल्हापूर, अंध मुलांची शाळा, कोल्हापूर या शाळांना भेटी देऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन नशामुक्त कोल्हापूर अभियानाची शपथ दिली.