no images were found
महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल 112 प्रकल्प कार्यान्वित
कोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना पोलीस सेवा टोल फ्रि क्रमांकावर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र अपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल 112 प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या अपत्कालीन प्रतिसाद प्रणालीला 29 सप्टेंबर 2022 रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजपर्यंत या प्रकल्पाअंतर्गत 11 हजार 495 कॉल पूर्ण केले आहेत, अशी माहिती नियंत्रण कक्ष अधिकारी जयसिंह रिसवडकर यांनी दिली आहे.
मागील एक वर्षापासून आजपर्यंत या प्रणाली मार्फत जिल्ह्यामध्ये त्रस्त नागरिकांकडून मदतीकरीता आलेले कॉल पूर्ण करण्यासाठी 38 चारचाकी ERV वाहने व 46 दुचाकी ERV वाहने संपूर्ण जिल्ह्यामध्ये 24 तास कार्यरत आहे.
हे सर्व कॉल पूर्ण करण्यास डायल 112 नियंत्रण कक्ष कोल्हापूर येथील डिस्पॅचर यांना सरासरी प्रतिसाद वेळ 5 मिनीटे 30 सेकंद लागला आहे. पोलीस ठाण्याकडील मदत पोहचवणारे ERV वाहनास सरासरी 16 मिनीटे 18 सेकंद इतका वेळ लागला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कॉल करवीर व शाहूपुरी पोलीस ठाण्यास आले आहेत. सध्या दिवसाला सरासरी 40 ते 45 कॉल पूर्ण केले जातात. जिल्ह्यामध्ये डायल 112 प्रणालीच्या अनुषंगाने एकूण सुपरवायझर करीता 11 अधिकारी, डिस्पॅचरसाठी 31 अंमलदार व ERV वाहनांवरील रिस्पाँडरसाठी 490 अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या डायल 112 नियंत्रण कक्ष येथे 3 अधिकारी व 20 पोलीस अंमलदार व दोन इंजिनिअर कार्यरत आहेत.
डायल 112 प्रकल्पाची विषेश कामगिरी – आत्महत्या करणाऱ्या लोकांचे कॉल मिळताच वेळेत पोलीस मदत पोहचल्यामुळे त्यांचे मन परावर्तीत होत आहेत. बाल विवाहास आळा बसत आहे. चेन स्नॅचर व चोरी याप्रकारचे चोर मिळून येत आहेत. अंमली पदार्थ मिळून येत आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी पोलीस मदत तत्काळ मिळत आहे. त्यामुळे नागरीकांचे जीव वाचत आहेत. घरगुती वादातुन होणाऱ्या दुर्घटना टळत आहेत.