no images were found
वर्ध्यात शक्तीपीठ संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आयोजित ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’चा पहिला टप्पा वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथे उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शक्तीपीठ महामार्गाच्या महत्त्वाबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाला वर्धा जिल्हाधिकारी वानमथी सी., एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत जमीन संपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि योग्य मोबदल्याची हमी दिली.
संवाद यात्रेत सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शवला. समृद्धी महामार्गामुळे झालेल्या विकासाचा अनुभव सांगताना शेतकऱ्यांनी वाढलेली जमीनमूल्ये, रोजगाराच्या संधी आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा यांचा उल्लेख केला. भविष्यात शक्तीपीठ महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
एमएसआरडीसीच्या या उपक्रमामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यात सकारात्मक संवाद निर्माण होत असून प्रकल्पाबाबत जनजागृतीसह लोकसहभाग वाढत असल्याचे चित्र दिसून आले.