no images were found
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
कोल्हापूर – नांदणी मठाची आणि समस्त कोल्हापूरवासियांचे प्रेम लाभलेली ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे आमचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या ‘उच्चस्तरीय समिती’समोर दोन बैठका झाल्या आहेत. जी कारणे आणि सोयी-सुविधा नसल्याचे कारण पुढे करून ‘माधुरी’ला वनतारा येथे नेण्यात आले, ती सर्व कारण आम्ही दुरुस्त केली आहे. ‘माधुरी’ परत येण्यासाठी ‘पेटा’ (प्राण्यांसाठी काम करणारी एक संघटना)ने विरोध केला आहे; मात्र त्यांनीही येथे येऊन पहाणी करावी, असे आमचे आवाहन आहे, अशी माहिती अपक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, ‘‘माधुरी हत्ती ज्या दिवशी वनताराकडे गेली त्या दिवशीपासून या संपूर्ण प्रकरणाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे आणि तिला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. माधुरी परत आणण्यातील बहुतांश अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या २ मासांपासून वनतारा आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे माधुरीसाठी अपेक्षित अशा सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जैन समाज हा अंहिसेला प्राधान्य देत असल्याने हत्तीच नाही, तर कोणत्याही प्राण्याला त्रास होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली असून मुख्यमंत्र्यांनीही अशा प्रकारची बैठक घेण्यास सहमती दर्शवली आहे.’’