Home Uncategorized मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध; शिवाजी विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध; शिवाजी विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

24 second read
0
0
33

no images were found

मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध; शिवाजी विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

कोल्हापूर, : ज्या शिवाजी विद्यापीठाने मला घडवले, त्या मातृसंस्थेचे ऋण फेडणे ही आता माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे. विद्यापीठाला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अधिक सक्षम, तंत्रज्ञानाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करू, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज व्यक्त केला.

       शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. कामत यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा वारणा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. कामत यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.

       यावेळी डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या प्रशिक्षणामुळेच विविध ठिकाणी काम करताना आव्हानात्मक परिस्थितीतही यशस्वीपणे कार्य करता आले. होमी भाभा राज्य विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह इतर विद्यापीठांमध्ये काम करताना तंत्रज्ञानाधारित प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रिसर्जंट एआय, डिजिटल प्रणाली आणि परिणामकारक व्यवस्थापन यांच्या साहाय्याने अनेक प्रश्न सोडवता आले.

      विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, प्लेसमेंट आणि ब्रँडिंग या बाबींवर विशेष भर देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे अभ्यासक्रम, रोजगारक्षम शिक्षण आणि आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. बी.एस्सी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, आयओटी, स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांसारखे अभ्यासक्रम काळाची गरज आहेत. विद्यापीठाने बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत पावले उचलली पाहिजेत.

      नॅक मूल्यांकन, एनआयआरएफ क्रमवारी आणि जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या निकषांचा उल्लेख करताना त्यांनी आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली. विद्यापीठाने ‘एस्टॅब्लिश्ड’ स्तरावरून ‘नॅशनल’ आणि ‘ग्लोबल’ स्तराकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. प्लेसमेंट, संशोधन, उद्योग सहकार्य आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवाजी विद्यापीठाला महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक समावेशकता, ज्ञान, संशोधन आणि समाजाभिमुख शिक्षण यांचा समन्वय साधण्याची भूमिका मांडली.

      यावेळी त्यांनी नॅक मूल्यांकनाच्या आगामी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्रितपणे परिश्रम घेण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, हायड्रोजन इंधन संशोधन आणि आधुनिक प्रयोगशाळा उभारणी यांवरही आगामी काळात भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वागतासाठी येणे टाळण्याचे आवाहन

       सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाचा उल्लेख करत डॉ. कामत यांनी स्वागतासाठी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले. “फोन, ई-मेल किंवा शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केलेले प्रेमही तितकेच महत्त्वाचे आहे. इंधन, वेळ आणि राष्ट्रीय संसाधनांची बचत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

      अध्यक्षीय मनोगतात वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे अभिनंदन करताना म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक म्हणून विविध स्तरांवर कार्य केलेली व्यक्ती आज या विद्यापीठाचे नेतृत्व स्वीकारत आहे, हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आपल्यापेक्षा अधिक सक्षम आणि व्यापक अनुभव असलेले नेतृत्व मिळणे आवश्यक असते. तसे नेतृत्व शिवाजी विद्यापीठाला डॉ. कामत यांच्या रुपाने मिळाल्याचा आनंद वाटतो. डॉ. कामत यांनी इतर विद्यापीठांमध्ये काम केल्यामुळे व्यापक शैक्षणिक जगाचा त्यांचा परिचय आहे आणि त्या अनुभवाचा फायदा ते मातृसंस्थेला निश्चितपणे मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     डॉ. शिर्के यांनी डॉ. कामत यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करताना नॅक मूल्यांकन, सायबर सिक्युरिटी, संगणक केंद्र आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून दिले. “जिथे प्रश्न तिथे कामत सर” अशी त्यांची ओळख असल्याचे सांगत त्यांनी, अत्यंत बारकाईने, संयमाने आणि रात्रंदिवस परिश्रम घेऊन काम पूर्ण करण्याची त्यांची वृत्ती विद्यापीठासाठी मोठी ताकद ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात नॅक, एनआयआरएफ, क्यूएस आणि टीएचईसारख्या राष्ट्रीय व जागतिक मानांकनांमध्ये विद्यापीठाची प्रगती वाढविण्यासाठी अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

      यावेळी डॉ. जी.बी. कोळेकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. सागर डेळेकर, प्रा. शंकरराव कुलकर्णी, डॉ. डी.आर. मोरे, डॉ. निखिल गायकवाड, तेजस्विनी गोरनाळे, धैर्यशील यादव, माजी कुलगुरू प्रा. एस.एच. पवार आणि नाथाजी शिंदे यांनी स्वागतपर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन नंदिनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी केले, तर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी आभार मानले.

     यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विद्यापीठातील अनेक माजी व विद्यमान पदाधिकारी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १…