no images were found
प्रक्रिया केलेलं सांडपाणी एमआयडीसी आणि कोरडवाहू शेतीला देण्याचा प्रस्ताव, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत झाली बैठक
कोल्हापूर:पंचगंगा नदीकाठावरील ९० गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील. प्रक्रिया केलेलं सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी ते एमआयडीसीसाठी द्यावं, असा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना, आमदार अमल महाडीक यांनी दिल्या. पंचगंगा प्रदूषणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पंचगंगा प्रदूषणप्रश्नी बैठक झाली. आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जलअभियंता हर्षजीत घाटगे, सुरेश पाटील यांच्यासह जलसंपदा, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. पंचगंगा नदीकाठावरील ८९ गावातील सांडपाणी थेट नदीत मिसळतं. त्यामुळं त्या ८९ गावांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याची गरज आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषदेनं प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. कोल्हापूर महानगरपालिकेनं दुधाळी आणि जयंती नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. दोन्ही ठिकाणी प्रक्रिया केल्यानंतर, १०० एम एल डी शुद्ध पाणी, पुन्हा पंचगंगा नदीत सोडलं जातं. वास्तविक हे पाणी एमआयडीसी आणि कोरडवाहू शेतीला पुरवण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना, आमदार अमल महाडिक आणि जिल्हाधिकार्यांनी दिल्या. यासंदर्भात पुन्हा १५ जून रोजी व्यापक बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीमध्ये दोन्ही प्रस्तावांचे आराखडे सादर करण्याच्या सूचना, संबंधित विभागांना देण्यात आल्या.