no images were found
कागलच्या नेत्याने 35 वर्ष सांभाळून मोठी केलेली एक तर संस्था जिल्ह्यात आहे का ?-प्रमोद पाटील यांचा सवाल
_मार्केट कमिटी, केडीसीसी , गोकुळ , शेतकरी संघावर प्रशासक तर भूविकास, महालक्ष्मी दूध संघ भुईसपाटच
कोल्हापूर : कागलच्या नेत्याच्या बगलबच्यांनी गोकुळचा 35 वर्षांचा हिशोब मागितला आहे .पण 35 वर्षाचा हिशोब मागितला म्हणजे ती संस्था अजून जिवंत आहे हेही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मान्य केले आहे. याउलट तुमच्या नेत्याने 35 वर्षाचा हिशोब देण्यासारखी कोणती संस्था जिल्ह्यात ठेवली आहे का ? असा सवाल भाजपचे मंडल अध्यक्ष आणि रेवणसिद्ध दूध संस्थेचे प्रमोद पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. मुळात हिशोब मागण्यासाठी संस्था जिवंत ठेवावी लागते याचे तरी भान बगलबच्यानी ठेवले पाहिजे. प्रत्येक वेळी घोकंपट्टी केलेले प्रश्न विचारून खोटे बोल पण रेटून बोल हीच भूमिका कागलच्या नेत्याच्या कार्यकर्त्यांची राहिली आहे असं टोलाही पाटील यांनी लगावला.
ज्या 35 वर्षातील 135 कोटींचा हिशोब मागता मग त्याच काळातील अन्य 280 कोटींची रक्कम कोणत्या वाहतूक संस्थेला अदा झाली याची पण माहिती घेतली तर पाठांतर केलेलं देखील बोलता येणार नाही. त्यामुळे अर्धवट माहिती सांगून मोठे होण्याचा प्रयत्न करू नका.अश्याने पाय झाकले जातील पण तोंड उघड पडेल अशी परिस्थिती होऊन बसेल लक्षात ठेवा.
पाच वर्षात चौकशी का केली नाही?
35 वर्षांचा हिशोब मागणाऱ्यांनी पाच वर्षे सत्ता असताना चौकशी का केली नाही असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी शेवटचे एक वर्ष स्वतः नवीद मुश्रीफ अध्यक्ष होते. तेव्हा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून का होईना या गोष्टींची चौकशी करणे गरजेचे होते. पण तसे न करता केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बगलबच्चांची कोल्हेकुई सुरू आहे असा टोला लगावला.
मग टीका महाडिकांवर का?
गोकुळ प्रकरणी तक्रार प्रकाश बेलवाडी यांनी केली तर गैरव्यवहाराची चौकशीची मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केले. असे असताना कागलच्या नेत्यांचे ठेवणीतले कार्यकर्ते मात्र महाडिकांवर टीका करत आहेत. जेव्हा की महाडिकांनी या मध्ये कुठे ही कोणावर ही वैयक्तिक टीका केलेली नाहीये. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत असे एका तोंडाने म्हणायचे आणि दुसऱ्या तोंडाने कार्यकर्त्यांकरवी महाडिकांवर आरोप करायचे हा दुटप्पीपणा सोडावा. महायुती धर्म काय फक्त महाडिकांनीच पाळावा का ? असा सवाल ही पाटील केला.
ज्या व्यक्तीला अपात्र करून संस्थेतून हाकलून दिलं अश्या लोकांना गोकुळ सारख्या चांगल्या संस्थेत स्वीकृत म्हणून बसवून दूध नासवायचं पाप केलं.* असा आरोप करत, लक्षात ठेवा गोकुळच्या कृष्णाचं सुदर्शन चक्र वेळी फिरेल तेव्हा भ्रष्टाचारी शिशुपालाचा अंत निश्चित असेल
महालक्ष्मी दूध संघ , भूविकास बँक मोडून खाल्ले तर मार्केट कमिटी , केडीसीसी , शेतकरी संघावर आपल्या गुणांमुळे प्रशासक येऊन बसले. शेतकरी संघाच्या बैलाला तर अजून उठता येईना. त्यामुळे पहिला आपल्या नेत्याकडे याचा हिशोब मागा मग गोकुळकडे या असे आव्हानही प्रमोद पाटील यांनी दिले आहे.