no images were found
जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने; ‘वारसा सफरी’ला उदंड प्रतिसाद!
कोल्हापूर (प्रतिनिधी):जागतिक वस्तुसंग्रहालय दिनाचे औचित्य साधून कोल्हापूरचा प्राचीन इतिहास, दुर्मिळ शस्त्रे आणि कलावैभवाची ओळख करून देणारी विशेष ‘वारसा सफर’ आज दिनांक १८ मे २०२६ अत्यंत उत्साहात संपन्न झाली. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पुरातत्त्व व पुरातत्त्व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई आणि कोल्हापूर वस्तुसंग्रहालय विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक ‘कोल्हापूर वस्तुसंग्रहालय’ (टाऊन हॉल) येथे सकाळी ११:३० ते दुपारी ०१:३० या वेळेत पार पडलेल्या या सफरीमध्ये संशोधक विद्यार्थी, इतिहास प्रेमी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या वारसा सफरीदरम्यान उपस्थितांना कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचा गौरवशाली इतिहास समजावून सांगण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ब्रम्हपुरी (कोल्हापूर) येथील ऐतिहासिक उत्खननात सापडलेल्या सातवाहन कालीन आणि प्राचीन रोमन संस्कृतीशी साधर्म्य दर्शवणाऱ्या दुर्मिळ वस्तू, मूर्ती आणि नाणी यांची सविस्तर माहिती तज्ज्ञांनी दिली. कोल्हापूर हे प्राचीन काळापासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र कसे होते, यावर या निमित्ताने प्रकाश टाकण्यात आला.
तसेच सफरीच्या दुसऱ्या टप्प्यात संग्रहालयातील छत्रपती शाहू महाराज काळ आणि मराठा साम्राज्यातील दुर्मिळ शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली. कोल्हापूर स्कूल ऑफ आर्ट्सच्या वैभवाची साक्ष देणारी जुनी दुर्मिळ चित्रे पाहून पर्यटक आणि कलाप्रेमी भारावून गेले.
या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते उपस्थित तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन:
डॉ. नीलांबरी जगताप, संचालक वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय यांनी कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची वास्तू म्हणजेच ऐतिहासिक ‘टाऊन हॉल’ इमारतीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. ही देखणी इमारत कोणी बांधली, तिचे वास्तुविशारद कोण होते आणि ब्रिटीश काळात ही इमारत नेमकी कोणत्या खास कारणासाठी निर्माण करण्यात आली होती, याचा संपूर्ण इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. ‘वस्तुसंग्रहालय’ म्हणजे नेमके काय आणि त्याची निर्मिती कशी होते, याबद्दल मूलभूत माहिती दिली. दुर्मिळ वस्तूंचे जतन करणे, त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ‘दस्तऐवजीकरण’ (Documentation) करणे आणि ही संपदा पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘संग्रहालय व्यवस्थापना’वर त्यांनी प्रकाश टाकला. वस्तुसंग्रहालये संचालनालया च्या अंतर्गत चालणाऱ्या कामांचा उलगडा केला. हे संचालनालय नेमके कशा पद्धतीने कार्य करते आणि त्याचे प्रशासन कोणकोणत्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेले आहे, याची सखोल माहिती त्यांनी दिली. प्रदर्शन विभाग, जतन विभाग (Conservation Unit) आणि संशोधन विभाग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून एक संग्रहालय कसे उभे राहते, हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.