no images were found
इंधन बचतीसाठी महापालिकेचा पुढाकार; पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रतिसाद
महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा इलेक्ट्रीक बाईकने तर आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचा इलेक्ट्रीक वाहनाने प्रवास
कोल्हापूर, : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर सौ. रूपाराणी संग्रामसिंह निकम यांनी आजच्या सर्वसाधारण सभेसाठी सर्व पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा अथवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहन, सायकल तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून महापालिकेत प्रवेश केला.
महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानापासून महापालिकेपर्यंत इलेक्ट्रिक बाईकद्वारे प्रवास करून या उपक्रमात सहभाग नोंदविला. तसेच आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाद्वारे महापालिकेत आगमन केले.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, उपसभापती दिपा ठाणेकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास तसेच सौ. प्रतिज्ञा उत्तुरे यांनी इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर केला. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी बसने प्रवास करून उपक्रमाला पाठिंबा दिला. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनीही इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाद्वारे महापालिकेत प्रवेश केला. तर इतर सर्व सदस्यांनी इलेक्ट्रीक चारचाकी गाडी, इलेक्ट्रीक दुचाकी व सार्वजनिक वाहनाद्वारे आजच्या महासभेस उपस्थिती दर्शविली.