no images were found
नागरिकांच्या पाणी प्रश्नाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या ३४३ कोटी रुपयांच्या योजनेमुळे परिसरातील १३ गावांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ होणार आहे. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारांना कामाची गती वाढविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
बैठकीदरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील यांनी या योजनेचे सुमारे ५१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. मात्र उर्वरित काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देत आमदार क्षीरसागर यांनी नागरिकांच्या दृष्टीने पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच कामामध्ये निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
योजनेअंतर्गत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या रस्ते खुदाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देत, ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत ती सर्व कामे संबंधित ठेकेदाराने पुढील एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अशा सक्त सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील, उपअभियंता पी. एच. गायकवाड तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.