no images were found
कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा
कोल्हापूर, :- कोल्हापूर विमानतळ परिघीय क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या तसेच भविष्यात होणाऱ्या बांधकामांच्या नियमितीकरणासाठी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी, उद्या शुक्रवार १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे*.
भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर यांचा ना हरकत दाखला घेणे, अनाधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवणे, तसेच घनकचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावणे या उद्देशाने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
विमानतळ फनेल झोनमध्ये होत असलेली अनधिकृत बांधकामे आणि उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रकारांमुळे विमानतळ सुरक्षिततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची मानके प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
कार्यशाळेमध्ये विमानतळ परिसरातील बांधकामांच्या उंचीबाबत घ्यावयाची परवानगी, विमानतळ प्राधिकरणाच्या नियमावली, तसेच आधुनिक व शास्त्रशुद्ध घनकचरा व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी क्रिडाई, कोल्हापूर, अर्किटेक्ट असोसिएशन तसेच उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उंचगाव, गांधीनगर आणि मोरेवाडी येथील लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकांना आमंत्रित करण्यात आले असून प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी संबंधित विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.