no images were found
शाहू स्मारकात निसर्गचित्र व रचनाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : ओल्ड इज् गोल्ड चित्रकार ग्रुपचे सदस्य चित्रकार अशोक धर्माधिकारी, अरुण सुतार आणि शिवाजी काटकर यांच्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन गुरुवार दि. ७ मे रोजी शाहू स्मारक भवन (कलादालन), दसरा चौक, कोल्हापूर येथे उत्साहात सुरू झाले.
प्रदर्शनाचे उद्घाटन क्रिडाई महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा माजी अध्यक्ष मा. विद्यानंद बेडेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मा. रवींद्र उबेरॉय हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मा. अरुण नरके उपस्थित होते.
या प्रदर्शनात निसर्गचित्र, रचनाचित्र, पेन्सील स्केच, व्यक्तीचित्र अशा विविध शैलीतील आकर्षक कलाकृती रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ज्येष्ठ चित्रकार अशोक धर्माधिकारी हे वयाच्या ८१ व्या वर्षीही कलेची अखंड साधना करत आहेत. स. म. लोहिया हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते भवानी मंडप आणि अंबाबाई मंदिर परिसरात दररोज पेन्सील स्केच तयार करतात. त्यांच्या १५ रचनाचित्रांचा प्रदर्शनात समावेश असून त्यांच्या कलासाधनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
व्यावसायिक चित्रकार अरुण सुतार हे व्यक्तीचित्र निर्मितीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले कलाकार आहेत. पूर्वी त्यांनी सिनेमा पोस्टर निर्मिती तसेच कॅलेंडर डिझाईनचे कामही केले आहे. पुणे, बेळगाव, कागल, सांगली, इचलकरंजी, नाशिक आणि कोल्हापूर येथे त्यांनी अनेक प्रदर्शने भरविली असून या प्रदर्शनात त्यांच्या २० कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.
हौशी चित्रकार शिवाजी काटकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या रिगेशन विभागातून ३५ वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर चित्रकलेकडे वळत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वॉल पेंटिंग, स्प्रे पेंटिंग आणि स्क्रीन प्रिंटींगमध्ये काम केलेल्या काटकर यांना पेन्सील शेडिंग, रेखाचित्र आणि निसर्गचित्रांमध्ये विशेष गती आहे. कोणतेही औपचारिक कला शिक्षण नसतानाही त्यांनी उत्कृष्ट कलाकृती साकारल्या असून त्यांच्या २० चित्रांचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले आहे.
हे प्रदर्शन दि. ७ मे ते ११ मे २०२६ या कालावधीत शाहू स्मारक भवनातील कलादालन येथे दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.