Home Uncategorized मे अखेरपर्यंत नाले सफाई पूर्ण करा, निवारा केंद्रांत हव्यात सर्व सुविधा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक

मे अखेरपर्यंत नाले सफाई पूर्ण करा, निवारा केंद्रांत हव्यात सर्व सुविधा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक

1 second read
0
0
6

no images were found

मे अखेरपर्यंत नाले सफाई पूर्ण करा, निवारा केंद्रांत हव्यात सर्व सुविधा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड :जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक

कोल्हापूर, : जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मे अखेरपर्यंत नाले सफाईची कामे पूर्ण करून प्रशासनाला तसे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, संभाव्य पूरबाधित गावांतील नागरिकांसाठी निश्चित केलेल्या निवारागृहांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि स्नागृहांच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा वेळेत नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील आणि लगतच्या जिल्ह्यातील सर्व धरणांमधील यंत्रणेचा समन्वय, पूरस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होता कामा नये, हाच प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समन्वयक प्रसाद संकपाळ यांच्यासह सर्व आस्थापनांचे विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि मुख्याधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेच्या तयारीसह प्रत्येक विभागाचा विस्तृत आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूरबाधित गावांमध्ये 100 टक्के ‘उद्घोषणा यंत्रणा’ बसवण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देताना सांगितले की, धोकादायक शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारती निश्चित करून तातडीने उपाययोजना कराव्यात. जिल्हा परिषदेने सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोकादायक इमारती व झाडांबाबत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून कडक कारवाई करणे आवश्यक आहे. कुठेही अपघात होता कामा नये. तसेच मान्सूनच्या कालावधीत कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याला मुख्यालय सोडता येणार नाही अथवा सुट्ट्या घेता येणार नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्ते दुरुस्ती, लगतची धोकादायक झाडे-फांद्या काढणे आणि बाधित होणाऱ्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्गांची डागडुजी मे अखेरपर्यंत पूर्ण करावी. ग्रामीण व शहरी भागातील स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना कोणत्या निवारागृहात जायचे आहे, याची पूर्वकल्पना देऊन मार्गदर्शक सूचना द्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील 16 प्रमुख नद्या आणि 91 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या 60 धरणांच्या पार्श्वभूमीवर, द्वार (दरवाजे) असलेल्या 7 मोठ्या धरणांच्या तांत्रिक तपासणीचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनात उपयोगात येणाऱ्या सर्व साहित्याची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आरोग्य विभागाने वैद्यकीय नियोजन करावे, पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या चाऱ्यासह निवारा केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवावी आणि महावितरणने विद्युत यंत्रणेतील धोके दूर करावेत, अशा सूचना डॉ. राठोड यांनी केल्या. प्रत्येक गाव, शहर आणि आस्थापनांनी आपले आपत्ती व्यवस्थापन आराखडे सर्व विभागांच्या समन्वयाने अद्ययावत करावेत; जेणेकरून मान्सून काळात उद्भवणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देता येईल. याबाबत तातडीने प्रत्येक गावात आणि शहरात सर्व विभागांच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या समन्वय बैठकांचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा कोल्हापूर, : महापालिकेच…