no images were found
आळंदी येथे “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा दिमाखदार शुभारंभ
· आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य शुभारंभ सोहळा संपन्न
· मराठी शाळा आणि मराठी उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना
आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात दिनांक १ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात “विश्वमंगल मराठी फाउंडेशन” चा भव्य शुभारंभ सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच देश-विदेशातून अनेक उद्योजक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शुभारंभ सोहळ्यास माननीय आमदार श्री. सुभाष बापू देशमुख (सोलापूर), प्रख्यात वक्ते व ज्येष्ठ निरुपणकार श्री. विवेकजी घळसासी, तसेच राज्यभरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक श्री. संजय वायाळ (ईशवेद बायोटेक प्रा. लि.), डॉ. उदय भोसले (वैज्ञानिक, लंडन) आणि श्री. आप्पासाहेब कोंढारे (सुवर्ण व्यावसायिक, दुबई) हे विशेषतः परदेशातून उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाची सुरुवात आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे महापूजन करून करण्यात आली. मंदिर समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या मंदिरापासून सभागृहापर्यंत दिंडी काढण्यात आली.
यानंतर सभागृहात मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”च्या लोगो व वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यामुळे कार्यक्रमात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
प्रास्ताविक भाषणात माननीय आमदार श्री. सुभाष बापू देशमुख यांनी फाउंडेशनची स्थापना करण्यामागील प्रेरणा स्पष्ट केली. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी शाळा आणि मराठी उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “विश्वमंगल मराठी फाउंडेशन” कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच “लोकल टू ग्लोबल” आणि “ग्लोबल टू लोकल” ही संकल्पना विशद करत उपस्थितांना फाउंडेशनच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी आशीर्वादपर शुभ संदेश देताना श्री. विवेकजी घळसासी यांनी माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांचा उल्लेख ध्येयवेढा नेतृत्व असा करत लोकमंगल ते विश्वमंगल या गेल्या २८ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव केला. मराठी भाषा, संस्कार, कुटुंबव्यवस्था आणि एकमेकांना मदतीचा हात देण्याची परंपरा जपत महाराष्ट्राला यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर परदेशातून आलेल्या मान्यवर उद्योजकांसह उद्योजक परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात महाराष्ट्रातील नवउद्योजकांना जागतिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत चर्चा करण्यात आली तसेच उद्योगवाढीच्या मार्गांवर मार्गदर्शन करण्यात आले.
“विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा सामाजिक संदेश घेऊन पंढरपूर ते आळंदी अशी सायकलवारी करणाऱ्या सायकल्स क्लब, पंढरपूरच्या सायकलवीरांचा स्वागत-सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात युवा भारूडकार कृष्णाई उळेकर यांनी सादर केलेला “बुरगुंड” हा समाजप्रबोधनात्मक भारूड कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. या भारुडामधून फाउंडेशनची कार्यपद्धती तसेच सामाजिक उपक्रमांची प्रभावी मांडणी करण्यात आली.
याशिवाय फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील विविध गावांतील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेणाऱ्या उद्योजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आळंदी येथे “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”ची पहिली स्थानिक समिती स्थापन करण्यात आली असून समितीतील सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप भक्तिभावपूर्ण वातावरणात पसायदान गाऊन करण्यात आला. “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”च्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि सामाजिक विकासासाठी व्यापक स्तरावर कार्य होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.