Home Uncategorized राज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

राज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

5 second read
0
0
11

no images were found

राज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, : भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र राज्य या प्रगतीचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या या कर्मभूमीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर विकासाचे रोल मॉडेल बनवूया, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जैन अल्पसंख्यांक अर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन ललित गांधी, आमदार शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री आबिटकर यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात मिळवलेला प्रथम क्रमांक ही अभिमानाची गोष्ट आहे. जिल्ह्यात आयटी पार्कच्या कामाला गती मिळत असून आता सर्किट बेंचही झाले आहे. पर्यटन, उद्योग, आरोग्य क्षेत्रात आपण गतीने पुढे जात आहोत. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ आणि ‘सौर कृषी वाहिनी’च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहोत. आरोग्य मंत्री म्हणून काम करताना ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही लोकचळवळ आपण उभारली असून, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महसूल विभागातील ‘डीम्ड एनए’ आणि अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

      ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान पालकमंत्री महोदयांनी निरीक्षण जीपमधून संचलनाची पाहणी केली. परेड कमांडर परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. पोलीस वाद्यवृंद पथकाकडून सादर करण्यात आलेल्या राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या धूनने उपस्थितांमध्ये देशभक्तीचे स्फुरण भरले. या सोहळ्यात जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये भारत स्काऊट आणि गाईड अंतर्गत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळवणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महिला व बालविकास क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या समाजसेविकांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यासोबतच आदर्श तलाठी, क्रीडा क्षेत्रातील गुणवंत महिला आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.

       कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पालकमंत्री आबिटकर यांनी उपस्थित विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांची भेट घेऊन सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा उचित सन्मान केला. प्रशासकीय गतीमानता आणि जनहितकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करत राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथर्व तावरे, प्रणव मोरे व ओजस व्हनमाने आघाडीवर.     

जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथ…