Home आरोग्य जागतिक हिवताप दिन: ‘मलेरियामुक्त’ भविष्यासाठी कटिबद्ध होऊया!

जागतिक हिवताप दिन: ‘मलेरियामुक्त’ भविष्यासाठी कटिबद्ध होऊया!

10 second read
0
0
10

no images were found

जागतिक हिवताप दिन: ‘मलेरियामुक्त’ भविष्यासाठी कटिबद्ध होऊया!

प्रतिवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरात ‘जागतिक हिवताप (मलेरिया) दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा मुख्य हेतू मलेरियासारख्या गंभीर आजाराबद्दल जनमानसात जागृती निर्माण करणे, रोगाचा प्रसार रोखणे आणि\ वेळेत निदान व उपचारांचे महत्त्व पटवून देणे हा आहे. विशेषतः वाढते प्रदूषण आणि जागतिक हवामान बदलामुळे कीटकजन्य व जलजन्य आजारांचे संकट भविष्यात अधिक गडद होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. मलेरिया हा केवळ ताप नसून तो कधीकधी जीवघेणा ठरू शकतो; विशेषतः भारतासारख्या उष्णकटिबंधीय विकसनशील देशांमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. चालू वर्षाच्या आकडेवारीनुसार, कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण ४० रुग्ण आढळून आले आहेत.  

      मलेरियाचा प्रसार नेमका कसा होतो, याचे रहस्य जगासमोर उलगडण्याचे महान कार्य ब्रिटीश वैज्ञानिक सर रोनाल्ड रॉस यांनी केले. १३ मे १८५७ रोजी भारतात जन्मलेल्या या महान शास्त्रज्ञाने १८९७ साली सिकंदराबाद येथे संशोधन करून असे सिद्ध केले की, मलेरिया हा ‘ॲनोफिलीस’ जातीच्या मादी डासामुळे पसरतो. त्यांच्या या क्रांतीकारी संशोधनाबद्दल त्यांना १९०२ मध्ये वैद्यकशास्त्रातील प्रतिष्ठित ‘नोबेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्याच स्मृतीप्रीत्यर्थ हा दिन साजरा केला जातो.  

     मलेरियाची लागण झाल्यास थंडी वाजून ताप येणे, प्रचंड घाम येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. वेळेत उपचार न मिळाल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, मात्र आनंदाची बाब अशी की, योग्य वेळी निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होतो. ‘रोग होण्यापेक्षा तो रोखणे’ या उक्तीप्रमाणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी घराबाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि मच्छर प्रतिबंधक क्रीम लावणे यांसारखे साधे उपाय प्रभावी ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या आजूबाजूला पाणी साचू न देणे; कारण डासांची पैदास ही साचलेल्या पाण्यातच होते. घरातील कुलर, जुने टायर, भांडी, उघड्या टाक्या, व्हेंट पाईप किंवा गुरांचे गोठे या ठिकाणी पाणी साचल्यास तिथे डासांच्या अळ्यांची वाढ होते. त्यामुळे अळी सर्वेक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून डासांची उत्पत्ती मुळापासून नष्ट करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.  

 

महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार ‘राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा’ अंतर्गत सन २०३० पर्यंत देशाला हिवतापमुक्त करण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२६ पासून ‘ग्राम समृद्ध अभियान’ आणि ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकण्यात आले आहे. 

    मलेरिया ही केवळ एक आरोग्य समस्या नसून ती सामाजिक आणि आर्थिक विकासाला खीळ घालणारी समस्या आहे. या वर्षीचे घोषवाक्य ‘हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे’ हे आपल्या सर्वांना जबाबदारीची जाणीव करून देते. चला तर मग, आपण सर्वजण मिळून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करूया आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करून एक निरोगी व सशक्त देश घडवूया.

— डॉ. संजय रणवीर (सहाय्यक संचालक, हिवताप, कोल्हापूर विभाग)

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…