no images were found
शाही थाटात पार पडला दातार कुटुंबीयांचा साखरपुडा सोहळा
मुंबई, : मसालाकिंग धनंजय दातार आणि वंदना दातार यांच्या सुपुत्र रोहित दातार यांचा सानिया नरवाडे यांच्यासोबत साखरपुड्याचा भव्य सोहळा मुंबईतील ताज लँड्स एंड येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यास कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमात आयोजित संगीतमय मैफलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत आणि सिद्धांत भोसले यांच्या सुरेल सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. यावेळी वधू-वरांच्या कुटुंबीयांनीही आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांच्या नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आकर्षक शैलीत केले.
या साखरपुड्याचे खास आकर्षण ठरले ते आधुनिक पद्धतीने साकारलेले रिंग सेरेमनी. ड्रोनच्या साहाय्याने अंगठ्या मंचावर आणण्यात आल्याने पारंपरिक सोहळ्याला नाविन्यपूर्ण स्पर्श मिळाला.
यावेळी धनंजय दातार यांनी नवदांपत्याला आयुष्यभर सुख, समृद्धी आणि एकत्रतेच्या शुभेच्छा दिल्या. सानियाचे आई-वडील सीमा आणि कुमार नरवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर रोहितचे बंधू हृषिकेश दातार व त्यांची पत्नी आकांक्षा यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहभाग घेतला.सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांनी विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत, आनंदी आणि संस्मरणीय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.