no images were found
भगवान आदिनाथ तीर्थंकर यांचा महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न
कोल्हापूर : येथील शुक्रवार पेठ मधील सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या स्वस्तिश्री लक्ष्मीसेन जैन मठ याठिकाणी भव्य अशी २८ फूट उंचीची भगवान आदिनाथ तीर्थंकरांची मूर्ती असून प्रतिवर्षी अक्षय तृतीया या शुभ दिनी या मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होत असतो. यावर्षीचे हे ६५ वे वर्ष असून यामध्ये विविध साधारण १८ ते २० प्रकारचे अभिषेक करण्यात आले. हा महामस्तकाभिषेक सोहळा आचार्य श्री सकलकीर्तीजी महाराज व आचार्य श्री चंद्रप्रभूसागर महाराज यांच्या पावन सानिध्यात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी यांच्या अधिनेतृत्वाखाली पार पडला. मुख्य यजमान पदाचा सन्मान सौ. कांचन भिवटे परिवारास मिळाला असून त्यांच्या शुभ हस्ते चंद्रप्रभू तीर्थंकर तसेच जाज्वल्य देवी ज्वाला मालिनी माता व आदिनाथ तीर्थंकर यांचे पूर्ण अभिषेक करण्याचा सन्मान या परिवारास मिळाला.
दुग्धाभिषेक, इक्षुरस (उसाच्या रसाचा), कुंकूम, हळदी, रक्तचंदन, श्वेतचंदन तसेच सर्वऔषधी नारिकेल, कषायचूर्ण, कलकचूर्ण, अष्टगंध पूर्णसुगंधित द्रव्य असे विविध अभिषेक मूर्तीवर करण्यात आले. यानंतर शांतीधार होऊन पुष्प वृष्टी करण्यात आली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून अनेक श्रावक श्राविक उपस्थित होते.
प्रतिवर्षीप्रमाणे मठामार्फत देण्यात येणारा या वर्षीचा आदर्श दांपत्य पुरस्कार सौ. किशोरी व प्रकाश आवाडे यांना प्रदान करण्यात आला.जैन मठात सकाळी ठीक ७.३० वाजता ध्वजारोहण होऊन मुख्य पूजा विधी सुरू झाले.मंदिरातील सर्व मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला.
दुपारच्या सत्रात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांचा पट्टाभिषेक यांचा वर्धापन दिन संपन्न झाला. महामस्तकाभिषेक सोहळ्यास आमदार राजेश क्षीरसागर, बेळगावचे आमदार अभय पाटील,नगरसेवक किरण शिराळे,स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, रत्नेश शिराळकर, राजेश लाटकर, प्रतिज्ञा उत्तरे, माधवी गवंडी,दिपा ठाणेकर, प्रतापसिंह जाधव,संजय शेटे भागातील सर्व नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी स्वस्तीश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे बाबुराव मगदूम, सुरेश रोटे, जे. बी. पाटील, संजय आडके, महावीर मगदूम, सुरज माणगावकर, सुरेश मगदूम, अतुल होनोले, विशाल शेटे, व शहरातील सर्व जिन मंदिरांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि ज्वाला मालिनी महिला मंडळ सह शहरातील सर्व महिला मंडळ भगिनी उपस्थित होत्या.